एक रस्ता, एक पक्ष, दोन आमदार ,दोन भूमीपूजने

Date: 2026-02-24
news-banner
नवयुग पालघर संपादकीय :

*एक रस्ता -एक पक्ष, दोन आमदार, दोन भूमिपूजने !*

           रस्ता एक, ज्या विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो तो  विभागही एकच, सार्वजनिक बांधकाम विभाग. आमदारही एकाच म्हणजे शिवसेना शिंदे पक्षाचे. तरीही भूमिपूजन सोहळे मात्र दोन आणि तेही वेगवेगळ्या दिवशी. एक  सफाळे भागात तर दुसरा पालघर भागात. असं म्हणतात की, सुरुवातीला चिंचणी भागात नियोजित असलेलं  हे भूमिपूजन  गावकर्‍यांच्या विरोधामुळे  रद्द  झाले आणि ते सरकलं माहीम भागात. भूमिपूजन प्रसंगी बोलताना दोघांनीही एकच दावा केला आहे, या रस्त्यामुळे विकासाला मोठी चालना मिळेल म्हणून. याचा अर्थ त्यांचे तेच जाणोत. कारण भूमिपूजन झालं तो रस्ता आधीच अस्तित्वात आहे. आता जे काम होत आहे, ते  रस्ता सुधारणा म्हणून. यातून वाहनांची गती वाढेल फारतर !
             दोनदा आणि दोन वेगवेगळ्या आमदारांनी भूमिपूजन केलेला हा रस्ता आहे, झाई- बोर्डी- चिंचणी-बोईसर -कोळगाव -माहीम -माकुणसार -सफाळे ते पारगावपर्यंतचा. 
       या रस्त्याच पहिलं भूमिपूजन केलं नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विलास तरे यांनी.  माजी मंत्री मनीषा निमकर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. नालासोपारा मतदारसंघातील पालघर तालुक्यातील सफाळे भागातून हा रस्ता जात असल्याने तरे यांनी हे भूमिपूजन केलं. त्यानंतर साहजिकच जाग आली पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र  गावित यांना. या रस्त्याचा मोठा भाग त्यांच्याच मतदारसंघातील डहाणू, पालघर भागातून जात आहे. गावीत यांनी चिंचणी येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरवला होता..मात्र तिथल्या गावकर्‍यांनी त्याला विरोध केला. मग गावित यांनी माहीम येथे पाणेरीजवळ आपला कार्यक्रम ठरवला आणि तेथे या रस्त्याचे भूमिपूजन केले. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन्ही ठिकाणी आपली हजेरी लावावी लागली आणि कार्यक्रमाची व्यवस्था देखील करावी लागली....माझ्या लोकसभा मतदारसंघातील हा रस्ता आहे असे सांगत खासदार हेमंत सवरा यांनी मागणी केली तर तिसर्‍यांदा भूमिपूजन होईल. ही कहाणी आहे दोन भूमिपूजनांची...
हा  रस्ता पूर्वीच अस्तित्वात आहे, इतकंच नव्हे तर  भूमिपूजन झालेल्या या रस्त्याला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी मिळाली आहे २०२२ मध्ये आणि कामाचे आदेश  मिळाले आहेत, मार्च २०२४ मध्ये. तरीही श्रेयासाठी धडपड !
           हे इथेच थांबले नाही. आपल्याच पक्षाच्या दोन आमदारांनी भूमीपूजन केल्यानंतर केदार काळे जागे झाले.तसे ते वेळोवेळी आपल्याच शासनाच्या निर्नयाविरोधात जागे होत असल्याचे आपण पाहिले आहे.मध्यंतरी नगरपरिषदेच्या कामाबद्दल वर्तमानपत्रातून आरोप होऊ लागल्यानंतर देखील त्यांना अशीच जाग आली होती.नगरपरिषदेचा हा निर्णय आपल्या पत्नी तत्कालीन नगराध्यक्षा डॉ.ऊज्वला काळे यांच्या कार्यकाळातील.तरीही ते याविरोधात उभे राहिले ? अर्थात काळे यांनी त्यावेळी जाब विचारला प्रशासनाला.त्यांच्या या आरोपाचे पुढे काय झाले हे तेच सांगू शकतील.
                प्रस्तूत रस्ते कामातही ते आपल्याच पक्षाच्या आमदारांपासून स्वत:ला अलग  ठेऊ  इच्छितात.असे करताना, आपल्या आमदारांनी अगदी डोळे झाकून भूमीपूजन केल्याचे ते अप्रत्यक्षरित्या सूचवू इच्छितात.पालघर नगरपरिषद कामांसंदर्भात  निविदा रकमेतील फुगवलेल्या  रकमेबद्दल आरोप करतानाही ते तत्कालीन नगराध्यक्षांबद्दलही अप्रत्यक्षरित्या  हीच  भूमिका घेतात. केदार काळे यांच्या या भूमिकांचा   रहस्यभेद व्हायला हवा !

Leave Your Comments