पालघर जिल्ह्यात २१ सप्टेंबरला नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता संख्याज्ञान मूल्यमापन परीक्षा

Date: 2025-09-18
news-banner


पालघर जिल्ह्यात २१ सप्टेंबरला नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता संख्याज्ञान मूल्यमापन( FLNAT )परीक्षा
२६ हजारांहून अधिक नवसाक्षर बसणार मूल्यमापनासाठी – जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या अध्यक्षतेखाली तयारीचा आढावा

पालघर :
जिल्ह्यातील नवसाक्षरांच्या शिक्षण प्रवासातील आणखी एक महत्त्वाची पायरी गाठली जाणार आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) ही राज्यस्तरीय परीक्षा येत्या रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी होत असून २६ हजार ४५५ नवसाक्षर यात सहभागी होणार आहेत. परीक्षेच्या व्यापक तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.

या परीक्षेत १८,०११ नवे प्रविष्ट तसेच मागील मार्च महिन्यात गैरहजर राहिलेले किंवा संपादन सुधारणा आवश्यक असलेले ८,५२४ नवसाक्षरांचा समावेश आहे. प्रत्येक परीक्षार्थी नोंदणी केलेल्या शाळेतच परीक्षा देणार असून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक केंद्र संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी उल्लास पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीची सुविधा परीक्षा दिनांकापर्यंत सुरू राहणार आहे.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण व कौशल्य विकास अधिकारी प्रशांत भामरे, समाजकल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम. हंडेकर, जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेषराव बडे यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे कार्यक्रमाची माहिती दिली, तर सहायक योजना अधिकारी महेश रनाळकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.

नवसाक्षरांना शेतीच्या ७/१२ उताऱ्याचे वाचन करता यावे यासाठी स्वयंसेवकांमार्फत प्रशिक्षण द्यावे, यावर जिल्हाधिकारी डॉ. जाखड़ यांनी विशेष भर दिला. यासाठी लवकरच स्वयंसेवकांचे स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. १७ मार्च २०२४ रोजी झालेल्या परीक्षेत १३,३४० पैकी १२,६२३ नवसाक्षर उत्तीर्ण झाले होते. तर २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या परीक्षेत २५,३३० पैकी तब्बल २५,१६७ नवसाक्षरांनी यश संपादन केले. या वर्षीची संख्या २६,४५५ वर पोहोचली असून डहाणू (७,३६९), वसई (५,३६३), पालघर (३,९५०), तलासरी (३,१९३), जव्हार (२,४२९), विक्रमगड (१,६२८), वाडा (१,७८८) आणि मोखाडा (७३५) अशी तालुकानिहाय नोंद झाली आहे.

सन २०२७ अखेर पालघर जिल्हा पूर्ण साक्षर करण्याचा संकल्प प्रशासनाने केला असून त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व समाजघटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.





Leave Your Comments