पालघरमधील रासायनिक कंपनीत भीषण स्फोट: एकाचा मृत्यू; दोन कामगारांची प्रकृती गंभीर

Date: 2025-09-18
news-banner
Navyug Palghar Weekly नवयुग पालघर

https://youtu.be/aIAFv2vozRg?si=hSs3M4g_BqfVTKpU

पालघरमधील रासायनिक कंपनीत भीषण स्फोट:
एकाचा मृत्यू; दोन कामगारांची प्रकृती गंभीर

पालघर, ता. १८ सप्टेंबर :
पालघर शहराच्या पूर्वेकडील जे.पी. उद्योग नगर परिसरातील निंबानी सॉल्ट इंडस्ट्री या कंपनीत गुरुवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कंपनीत ऍसिड व मेटल पदार्थांच्या रासायनिक प्रक्रियेदरम्यान अचानक स्फोट झाला. यावेळी काम सुरू असलेले पाच कामगार जखमी झाले. त्यापैकी दीपक आंधेर (वय ३२, रा. अंबाडी मोरवाळी) याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. दिनेश गडग (४०, रा. वरखुंटी) आणि सुरेश कोम (४०, रा. शेलवली) हे गंभीर जखमी असून लक्ष्मण मंडळ (51) आणि संतोष तरे (४६) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

स्फोटानंतर लगेचच जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कंपनी व्यवस्थापनाची चौकशी सुरू होती.

या दुर्घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली तसेच मृताच्या नातेवाईकांना धीर दिला. औद्योगिक सुरक्षा संचलनालय आणि महावितरण विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाची कारणमीमांसा करण्यासाठी तपास सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Leave Your Comments