https://youtu.be/l7UZgUxuKeA?si=iu4lTRIyj4tdwaa-
“देशाच्या प्रगतीत अभियंते हे कणा” – रवींद्र शिंदे
कार्यक्रमात कार्यरत व निवृत्त अभियंत्यांचा सन्मान
पालघर, दि. 19 (प्रतिनिधी) –
“देशाच्या प्रगतीत अभियंते हे कणा आहेत. प्रत्येक विकासकामाच्या मागे अभियंत्यांचा काटेकोर अभ्यास, नियोजन व परिश्रम असतात. सामाजिक बांधिलकी जपत अभियंत्यांनी अधिक प्रभावी भूमिका पार पाडाव्यात,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषद पालघर व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना शाखा पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभियंता दिन कार्यक्रमात ते बोलत होते. भारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा अभियंता दिन जिल्हा परिषदेत उत्साहात पार पडला.
या वेळी प्रकल्प संचालिका जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. रूपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जागृती संखे, कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) दिलीप पाडवी, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) सचिन सुरुम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात निवृत्त तसेच कार्यरत अभियंत्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानित अभियंत्यांनी आपल्या मनोगतातून अभियंता दिनाचे महत्त्व अधोरेखित करत आपल्या कार्यकाळातील अनुभव समोर ठेवले.
डॉ. रूपाली सातपुते यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता जागृती संखे यांनी महिला अभियंत्यांचा विकास प्रक्रियेत वाढता सहभाग ही सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन केले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे यांनी पुढील वर्षापासून अभियंता दिन अधिक व्यापक पातळीवर साजरा करण्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ अभियंता काशिनाथ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन नितीन आहेर यांनी केले. जिल्हाभरातील अभियंत्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.