**२० डिसेंबर निवडणूक : दारूबंदी निर्णय फक्त प्रभागापुरता**

Date: 2025-12-20
news-banner
                 नवयुग पालघर विशेष : 

       **२० डिसेंबर निवडणूक : दारूबंदी निर्णय फक्त                   प्रभागापुरता**

           निवडणूक पारदर्शकतेच्या नावाखाली जाहीर केलेला ‘कोरडा दिवस’चा निर्णय पालघर जिल्ह्यात सध्या चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरत आहे. संपूर्ण नगरपरिषद किंवा नगरपंचायत हद्दीत बंदी घालण्याऐवजी केवळ प्रभागापुरतीच मद्यविक्री बंदी लागू केल्याने हा निर्णय हास्यास्पद आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रश्नांकित ठरत आहे.

केवळ प्रभागापुरतीच दारूबंदी : मद्यप्रेमी व दारू दुकानदारांचे हित : 

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार, पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद व वाडा नगरपंचायतच्या अनुक्रमे प्रभाग क्रमांक १/४ व प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रत्येकी एक जागेसाठी २० डिसेंबर रोजी निवडणूक होत असून रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद व वाडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासह उर्वरित जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले असून, त्याची मतमोजणी देखील २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

कुठे आणि कधी बंदी? आणि बंदी कालावधी, बंदी क्षेत्र : 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशानुसार –

शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ – पूर्ण दिवस

शनिवार, २० डिसेंबर २०२५ (मतदानाचा दिवस) – पूर्ण दिवस

पालघर नगरपरिषद – प्रभाग क्रमांक १ मधील जागा क्रमांक १/४ व वाडा नगरपंचायत – प्रभाग क्रमांक १२ ची हद्द

या कालावधीत फक्त संबंधित प्रभागांमध्ये सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी यांनी   राज्य निवडणूक आयोग व राज्य उत्पादन शुल्क विभाग, पालघर  यांच्या विविध आदेशांच्या आधारे निवडणूक शांततेच्या कारणास्तव मद्यविक्रीवर बंदी घालण्याचे हे आदेश जारी केले असल्याचे या आदेशात म्हटले आहे .

निर्णयावर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, संपूर्ण नगरपरिषद किंवा नगरपंचायत हद्दीऐवजी केवळ एका प्रभागापुरतीच दारूबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे एकाच शहरात काही भाग ‘कोरडा’, तर काही भाग खुले राहणार आहेत. परिणामी—
बंदी लागू असलेल्या क्षेत्रातील मद्यप्रेमी नागरिक तसेच निवडणुकीत मद्याचा वापर करू मागणारे, शेजारच्या प्रभागात जाऊन सहज मद्य खरेदी करू शकतात. साहजिकच, एकूणच ज्या कारणासाठी बंदी लागू केली जाते तो उद्देश व कायदा-सुव्यवस्थेवर अपेक्षित परिणाम होण्याबाबत शंका निर्माण होते. इतकेच नव्हे तर केवळ क्षेत्रापुरती बंदी घालणारे, मद्यप्रेमी व दारू दुकानदारांचे हित जपत असल्याचे स्पष्टपणे दिसते...

निवडणूक प्रक्रियेत शांतता राखण्याचा उद्देश असला तरी असा अर्धवट आणि विसंगत निर्णय प्रत्यक्षात कितपत परिणामकारक ठरणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

“कोरडा दिवस” की केवळ कागदी कारवाई?

निवडणूक काळात दारूबंदी ही नवी बाब नाही. मात्र यावेळी घेतलेला निर्णय निवडणूक सुधारणा करण्याऐवजी प्रशासनिक विनोद ठरत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पूर्ण नगरपरिषद हद्दीत बंदी घातली असती, तर निर्णय अधिक स्पष्ट, प्रभावी आणि न्याय्य ठरला असता, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.

आता या निर्णयाचा प्रत्यक्ष अंमल कसा होतो याकडे पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .

Leave Your Comments