**डहाणू येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा वार्षिक तत्परता सराव (मोबिलायझेशन ड्रिल) यशस्वी

Date: 2026-03-01
news-banner
नवयुग पालघर, विशेष : 

**डहाणू येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा वार्षिक तत्परता सराव (मोबिलायझेशन ड्रिल) यशस्वी**

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा (National Disaster Response Force) (NDRF )  वार्षिक तत्परता सराव (मोबिलायझेशन ड्रिल) यशस्वीरीत्या पार पडला. सकाळी ८.४५ ते ११.०० या वेळेत आयोजित या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय, तत्परता आणि कार्यक्षमता तपासणे हा होता.

या सरावामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, अग्निशमन विभाग, आपदा मित्र, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग तसेच नागरी संरक्षण दल यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

सरावाच्या अनुषंगाने डहाणू तालुक्यातील एका ठिकाणी आग लागल्याची काल्पनिक माहिती देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीदरम्यान औद्योगिक सुरक्षा विभागामार्फत त्या ठिकाणी किरणोत्सर्गी स्रोत (Radiation Source) असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पालघर पथकाला पाचारण करण्यात आले.

यानंतर पोलीस विभागाने घटनास्थळी आवश्यक बंदोबस्त तैनात करून परिसर सुरक्षित केला. नागरी संरक्षण दल व आपदा मित्र यांच्या सहकार्याने बाधितांना  प्रथमोपचार देण्यात आले.

     राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद  पथकाने किरणोत्सर्ग मापन यंत्र ( Radiation Dosimeter ) च्या सहाय्याने किरणोत्सर्गाची पातळी मोजून परिस्थितीचे मूल्यमापन केले. त्यानंतर तात्काळ वैयक्तिक किरणोत्सर्गीय निर्दूषण  केंद्र ( Personal Decontamination Station)  उभारून प्रभावित व्यक्तींच्या शरीरावर व वस्तूंवर चिकटलेले किरणोत्सर्गी दूषण शास्त्रोक्त पद्धतीने दूर करण्याची कार्यवाही करण्यात आली.
हा  प्रात्यक्षिक सराव नाशिक जिल्ह्यातील  जिंदाल ग्रुप  कंपनीमध्ये पूर्वी घडलेल्या आगप्रसंगाच्या अनुषंगाने प्रतिसाद पद्धती लक्षात घेऊन राबविण्यात आला.

या सरावामुळे विविध विभागांतील समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता अधोरेखित झाली असल्याचे नमूद करून पालघर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेक कदम यांनी म्हटले आहे.

Leave Your Comments