पालघर जिल्हा परिषद पेसा भरती : ८१९ शिक्षण सेवकांना नियुक्ती आदेश वितरण
पैसा भरती साठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेने अखेरीस पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या ८१९ उमेदवारांना नियमित नियुक्ती आदेश वितरित केले . शासन निर्णय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शिक्षण सेवक पदांची पदभरतीची ही प्रक्रिया पूर्ण केली असून ही प्रक्रिया पारदर्शक व कायदेशीर चौकटीत राबविण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या प्रक्रियेमुळे स्थानिक पात्र आदिवासी उमेदवारांना न्याय मिळाला असून पेसा क्षेत्रातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली.
नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रम खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.
*न्यायालयीन प्रक्रियेनंतर नियमित नियुक्ती :*
पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०२४ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार संबंधित उमेदवारांना मानधन तत्वावर कार्यरत ठेवण्यात आले होते. पुढे ११ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार तसेच आयुक्त (शिक्षण) यांच्या २५ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार या उमेदवारांना शिक्षण सेवक पदावर नियमित नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करून नियुक्ती आदेश वितरित केले.
*लोकसंख्येच्या प्रमाणावर पदांचे वाटप : *
भरती प्रक्रियेत रिक्त पदांच्या मर्यादेत एकूण ८१९ पदे भरण्यात आली. पेसा क्षेत्रातील ग्रामनिहाय अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्यात आली. ज्या गावांमध्ये अनुसूचित जमाती लोकसंख्या २५ टक्क्यांपर्यंत आहे, तेथे २५ टक्के पदे; २५ ते ५० टक्के लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ५० टक्के पदे; तसेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये रिक्त पदांच्या ५० टक्क्यांपर्यंत पदे भरण्यात आली. त्यामुळे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देत नियमानुसार भरती पार पडली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
*१६ ग्रामसेवकांनाही आदेश*
याचबरोबर मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या १६ ग्रामसेवकांनाही नियुक्ती आदेश देण्यात आले असून, पेसा क्षेत्रात त्यांची कंत्राटी स्वरूपात नियमित नियुक्ती करण्यात आली आहे.
“रिक्त पदांच्या ५० टक्के मर्यादेत सर्व ८१९ उमेदवारांना सामावून घेण्यात आले आहे. शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करूनच आदेश निर्गमित करण्यात आले असून सर्व पात्र उमेदवारांना न्याय मिळेल याची दक्षता घेण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी म्हटले आहे.” नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर उमेदवारांनी आनंद व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले.