**डहाणूचे तत्कालीन सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांच्यासह सात जणांवर गुन्हा; काजळी सामुदायिक शेती संस्थेतील कोट्यवधींचा अपहार उघड**

Date: 2026-03-03
news-banner

नवयुग पालघर खास वृत्त : 

https://youtu.be/_4f6o7XNHKE?si=en4qRGSa7K7VkL1D

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील काजळी येथील सामुदायिक शेती सहकारी संस्थेतील कोट्यवधींच्या कथित अपहारप्रकरणी धक्कादायक वळण लागले असून, डहाणूचे तत्कालीन सहाय्यक निबंधक तथा सध्या पालघरचे विद्यमान सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांच्यासह सात जणांविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

**डहाणूचे तत्कालीन सहाय्यक निबंधक अजय गुजराथी यांच्यासह सात जणांवर गुन्हा; काजळी सामुदायिक शेती संस्थेतील कोट्यवधींचा अपहार उघड**

तलासरी : काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था मर्यादित या अवसायनातील संस्थेमध्ये सुमारे ₹५ कोटी ६९ लाखांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार, संगनमत व अपहार झाल्याचा ठपका ठेवत तलासरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या अपहार प्रकरणात  डहाणूचे तत्कालीन सहाय्यक निबंधक तथा सध्या पालघरचे विद्यमान सहाय्यक निबंधक अजय गुजराथी हेच सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून ज्यांच्यावर संस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली असे संस्थेचे अवसायक उमाकांत नानाजी चेटुले, काजळी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष उपेंद्र रामजी रॉय, उपाध्यक्ष रामजी रामचंद्र रॉय, उर्जा ग्लोबल ट्रेडिंगचे रविंद्रकुमार हरीजन, मे. परफेक्ट असोसिएट्सचे निमिष किर्तीकुमार शाह आणि नोटरी व्यवहारास मान्यता देणारे मेहुल रणजीतसिंग ठाकुर हे देखील सहभागी असल्याची माहिती पुढे आल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही फिर्याद जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील द्वितीय श्रेणी लेखापरीक्षक सतिश नागटिळक यांनी दिली असून, २०२६-१७ ते २०२२-२३ या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षणात गंभीर आर्थिक अनियमितता आढळून आल्यानंतर  हीकारवाई करण्यात आली आहे.

*७० लाखांचा थेट बँक व्यवहार*

फिर्यादीनुसार, दिनांक १५ व १६ ऑक्टोबर २०१९ रोजी संस्थेच्या खात्यातून एकूण ₹७० लाखांची रक्कम आरटीजीएसद्वारे उर्जा ग्लोबल ट्रेडिंग कंपनीच्या खात्यात वर्ग करण्यात आली. या व्यवहारास संचालक मंडळाची मंजुरी नव्हती तसेच रक्कम वर्ग करण्यामागे कोणतेही वैध कारण नसल्याचे लेखापरीक्षणात म्हटले आहे.
धनादेश व आरटीजीएस अर्जांवर तत्कालीन अध्यक्ष उपेंद्र रॉय व उपाध्यक्ष रामजी रॉय यांच्या सह्या असल्याचे तपासणी दरम्यान आढळले आहे. या व्यवहारात रविंद्रकुमार हरीजन यांच्याशी संगनमत करून अपहार केल्याचा आरोप आहे.

* ६.३९ कोटींची जमीन ७० लाखांत विक्री*

संस्थेच्या मालकीची २०-२७-२९ हे.आर. क्षेत्रफळाची जमीन, ज्याची शासकीय बाजार किंमत सुमारे ₹६,३८,२७,१०० इतकी असल्याचे इंडेक्स-२ नुसार नमूद आहे, ती केवळ ₹ ७० लाखांत विकण्यात आल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे.
७ जुलै २०२२ रोजी डीड ऑफ कन्व्हेयन्सद्वारे ही विक्री करण्यात आली. मात्र या व्यवहारास —
वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी नव्हती,
जाहीर लिलाव झाला नव्हता,
सक्षम निबंधकाची पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती यासोबतच,
अवसायक उमाकांत चेटुले यांनी मे. परफेक्ट असोसिएट्सचे निमिष शाह यांच्या लाभात ही जमीन विक्री केली असल्याचा आरोप आहे. या व्यवहारास नोटरी मान्यता देणारे मेहुल ठाकुर यांचाही यामध्ये समावेश आहे.

*निबंधकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष*
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर यांनी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या पत्राद्वारे जमीन विक्री व्यवहार न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तसेच ₹ ७० लाखांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून जमीन विक्री प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

*सहकार कायद्यांतर्गत गुन्हा*

या प्रकरणात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८१(५)(ब), १०२, १०३ व १०५ अंतर्गत नियमभंग झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. वैधानिक लेखापरीक्षण अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली होती.

*पोलिस तपास सुरू*

तलासरी पोलीस ठाण्यात या संबंधात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अजय लक्ष्मण गोरड करत आहेत. प्रकरणात आणखी आर्थिक व्यवहार, कागदपत्रे व संगनमताबाबत तपास केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून,सहाय्यक निबंधकच यात सहभागी असल्याचे व अवसायक तसेच तत्कालीन पदाधिकारीही सहभागी असल्याचे उघडकीस आल्याने, संस्थेच्या सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave Your Comments