नवयुग पालघर विशेष :
**मासवणमध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिनी गुणवंतांचा शास्त्रज्ञ डॉ. विनायक कांबळे यांच्या हस्ते गौरव**
आदिवासी सहज शिक्षण परिवार यांच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ तसेच ‘रंजक विज्ञान स्पर्धा २०२६’ चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विज्ञानाविषयी कुतूहल जागवणाऱ्या विविध प्रात्यक्षिकांनी आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रम रंजक बनला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नीता साने होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, थिरूवनंतपुरम (IISER) येथील शास्त्रज्ञ डॉ. विनायक कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वर्षा फातर्फेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली.
१९७८ मध्ये अनुताई लिमये यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली चार दशकांहून अधिक काळ आदिवासी भागात कन्या छात्रालयाच्या माध्यमातून शिक्षणसेवा देत आहे. सध्या अझीम प्रेमजी फाउंडेशन यांच्या सहकार्याने १४ पाड्यांमध्ये ‘खेळघर’ आणि १८ जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘पुस्तकगाडी’ हे उपक्रम राबविले जात आहेत, अशी माहिती देण्यात आली.
संस्थेच्या विश्वस्त विद्या पाटील यांनी ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’चे महत्त्व अधोरेखित करताना वैज्ञानिक सी व्ही रामन यांच्या ‘ रामन इफेक्ट’ या ऐतिहासिक शोधाचा प्रवास उलगडून सांगितला. “विज्ञानाचा शोध हा कुतूहल आणि प्रश्नांमधून लागतो. विद्यार्थ्यांनी आपले कुतूहल जिवंत ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले.
मुंबईचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या आयआयएसईआर तिरुवनंतपुरम येथे प्राध्यापक व संशोधक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विनायक कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध प्रात्यक्षिके सादर केली. लेझर किरणांच्या साहाय्याने भिंगांमधील प्रकाशाचा प्रवास, कागदी मायक्रोस्कोपद्वारे बुरशी व कांद्याच्या पेशींचे निरीक्षण, तसेच विशेष ग्रहण चष्म्यांतून सूर्यदर्शन अशा प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
“विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा नव्हे; आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागचा ‘का?’ हा प्रश्न विचारणे म्हणजे विज्ञान. कुतूहलाचे पंख लावून उंच भरारी घ्या,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले.
*रंजक विज्ञान स्पर्धा २०२६ – निकाल*
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित स्पर्धेत परिसरातील जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळांमधील एकूण ११ शाळांतील ४५२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रथम क्रमांक : वेदांत प्रशांत यादव (९४%) – लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, मनोर
द्वितीय क्रमांक (विभागून):
मासवण विभाग हायस्कूल (३ विद्यार्थिनी) : १. अल्पेक्षा नरेश दुमाडा, २.समिरा अनंता गुजर,३. रुपाली गंगाराम तांबडी ;
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, लालठाणे (२ विद्यार्थिनी)१.मोनाली किसन तांबडी,२. नीता बाबल्या गवते
तृतीय क्रमांक (विभागून) :
नूतन विद्यालय, बहाडोली (२ विद्यार्थिनी):१. रिया मयुर किणी, २. परिधी संजय किणी ; अनुदानित आश्रमशाळा, मासवण : योगेश गंगाराम बेंडगा
उतेजनार्थ :१. स्वाती बाळाराम सांबरे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खुटल; २.आकाश सीताराम धोदडे व ओमकार अर्जुन म्हसकर, अनुदानित आश्रमशाळा - मासवण
विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयातील वाढता उत्साह लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून मासवण येथे सुसज्ज ‘विज्ञान केंद्र’ तसेच तीन आश्रमशाळांमध्ये ‘विज्ञान खेळघर’ सुरू करण्याची घोषणा अध्यक्षीय भाषणात डॉ. नीता साने यांनी केली.
कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहर नागोरी, ज्योती केळकर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने कार्यक्रमाची सांगता झाली.