**विनाशकारी वाढवण बंदराविरोधात लढा तीव्र; २३ मार्चला मुंबईत ‘महा-आक्रोश’ मोर्चा — मुंडेश्वरी देवीला गाऱ्हाणे घालून प्रचाराचा शंखनाद**

Date: 2026-03-09
news-banner
नवयुग पालघर Navyug Pakghar  खास वृत्त : 
https://youtube.com/shorts/0s1mIYYcbKo?si=ExZuZiQ2J0QEVl5b
**विनाशकारी वाढवण बंदराविरोधात लढा तीव्र; 
२३ मार्चला मुंबईत ‘महा-आक्रोश’ मोर्चा — 
मुंडेश्वरी देवीला गाऱ्हाणे घालून प्रचाराचा शंखनाद**

पालघर : वाढवण बंदरासह विविध विनाशकारी प्रकल्पांविरोधातील आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे दिसू लागले असून, येत्या २३ मार्च २०२६ रोजी मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा भव्य ‘महा-आक्रोश’ मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. अस्तित्वाच्या लढाईसाठी भूमिपुत्र, मच्छिमार, शेतकरी आणि कष्टकरी जनता मोठ्या प्रमाणात एकवटणार असल्याचे समिती प्रतिनिधींनी म्हटले आहे.

या ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात आज (सोमवार, ०९ मार्च )वाढवण येथील तिघरेपाडा येथील मुंडेश्वरी मातेच्या मंदिरात पार पडलेल्या बैठकीतून झाली. मुंडेश्वरी मातेच्या चरणी नारळ वाढवून व गाऱ्हाणे घालून आंदोलनाच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे.

“ज्या निसर्गाने आणि समुद्राने आम्हाला पिढ्यानपिढ्या जगवले, त्या निसर्गाचे रक्षण करण्याची ताकद आम्हाला दे,” असे साकडे यावेळी उपस्थितांनी देवीपुढे घातले.

बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून, येत्या काही दिवसांत गावोगावी जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिशवर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती तसेच विविध मच्छिमार, आदिवासी आणि युवा संघटनांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आधी वाढवण बंदरासह विविध प्रकल्पांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड संख्येने मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. आता त्यानंतरचे हे दुसरे आणि अधिक निर्णायक पाऊल मानले जात आहे. 
या मोर्चातून थेट सरकारला जाब विचारण्याचा आणि जनतेच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

२३ मार्च रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने नारायण पाटील व वैभव वझे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया :
“आज ९ मार्च रोजी आम्ही वाढवण येथील मुंडेश्वरी मातेच्या चरणी नारळ वाढवून आणि गाऱ्हाणे घालून या अन्यायाविरुद्ध प्रचाराचा शंखनाद केला आहे. येत्या २३ मार्चला मुंबईत ‘महा-आक्रोश’ मोर्चा निघणार असून हजारो मच्छिमार, शेतकरी आणि कष्टकरी बांधव आपल्या अस्तित्वासाठी आवाज उठवतील. जोपर्यंत हे विनाशकारी प्रकल्प कायमचे रद्द होत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,”
— वैभव वझे, सचिव, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती.
या आंदोलनातून “आता नाही तर कधीच नाही” असा निर्धार व्यक्त करत, निसर्ग, समुद्र आणि स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा संकल्प आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

Leave Your Comments