डहाणूत ३१ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

Date: 2026-07-30
news-banner
नवयुग पालघर 

***डहाणूत ३१ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’***

डहाणू : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत डहाणू विधानसभा मतदारसंघासाठी महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वडकून-डहाणू येथील पांचाळ हॉल येथे हे शिबिर होणार आहे.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि डहाणूचे आमदार विनोद निकोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी तसेच तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक उपस्थित राहणार आहेत.

या महसूल समाधान शिबिरामध्ये ७/१२ उतारे, विविध दाखले व प्रमाणपत्रे, स्वामित्व कार्ड, आयुष्मान भारत आरोग्य कार्ड, अद्ययावत सर्व्हे नकाशे, फार्मर आयडी, वनपट्टाधारकांसाठी AgriStack व e-KYC, दिव्यांगांसाठी UDID नोंदणी, आधार प्रमाणीकरण, डिजिटल जीवन प्रमाणपत्र आदी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच विविध सामाजिक कल्याण योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी व अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
महिलांसाठीही विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, महिला शेतकरी दर्जा प्रमाणपत्रांचे वितरण, महिला बचत गटांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून देणे तसेच ७/१२ उताऱ्यावर पत्नीच्या नावाची नोंद अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

याशिवाय पात्र शेतकऱ्यांना फार्मर आयडी, शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमण नियमितीकरण, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला गती, अद्ययावत ७/१२ अभियान, कृषी जमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रांवरील पात्र प्रकरणांमध्ये नोंदणी शुल्क माफी यांसारख्या महसूल विभागाच्या महत्त्वाच्या उपक्रमांवरही विशेष भर देण्यात येणार आहे.







Leave Your Comments