पालघर- वसई-विरार पूरग्रस्तांसाठी ८१.२२ कोटींचे विशेष मदत पॅकेज; दुकानदार, फेरीवाले, मच्छीमारांचाही प्रथमच समावेश****

Date: 2026-08-05
news-banner
नवयुग पालघर 
****पालघर- वसई-विरार पूरग्रस्तांसाठी ८१.२२ कोटींचे विशेष मदत पॅकेज; दुकानदार, फेरीवाले, मच्छीमारांचाही प्रथमच समावेश****

जुलै २०२६ मधील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील बाधित नागरिकांसाठी राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज मंजूर केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावानुसार विद्यमान निकषांनुसार मिळणारी १२.८० कोटी रुपयांची मदत वाढवून ८१.२२ कोटी रुपये करण्यात आली असून, ६८.४० कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत आयोजित बैठकीत  जिल्ह्यातील आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील बाधितांनी विशेष पॅकेजची मागणी केली होती. ही मागणी काही अंशी मान्य झाली आहे.

मदत व पुनर्वसन विभागामार्फत शासनाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (Budget Distribution System-BDS) द्वारे निधी वितरित करण्यात आला आहे. पूरानंतर करण्यात आलेले पंचनामे, क्षेत्रीय पाहणी आणि नुकसानीच्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी विविध घटकांकडून विशेष पॅकेजची आग्रही मागणी आल्यानंतर, राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. 
या प्रस्तावाला पालकमंत्री गणेश नाईक आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचेही पाठबळ मिळाले.

*दोन अतिवृष्टीच्या कालावधींसाठी वाढीव मदत*
१ ते ८ जुलै २०२६ आणि २२ ते २४ जुलै २०२६ या दोन अतिवृष्टीच्या कालावधीतील नुकसानीसाठी विद्यमान निकषांनुसार अनुक्रमे ८.५३ कोटी आणि ४.२७ कोटी रुपये मदत देय होती. शासनाच्या विशेष मंजुरीनंतर ही मदत अनुक्रमे ६४.०४ कोटी आणि १७.१६ कोटी रुपये करण्यात आली आहे.

*उपजीविकेच्या नुकसानीलाही मदत*
या पॅकेजमध्ये प्रथमच दुकानदार, फेरीवाले, पोल्ट्री शेड, बोटी आणि उपजीविकेच्या इतर साधनांच्या नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे.
पूरग्रस्त दुकाने व व्यावसायिक आस्थापनांना प्रति आस्थापना ५० हजार रुपये मदत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील ६,०६५ दुकानदारांना ३०.३२ कोटी, तर दुसऱ्या टप्प्यातील २७७ दुकानदारांना १.३८ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
फेरीवाले व तात्पुरत्या आस्थापनांना प्रति लाभार्थी १० हजार रुपये मदत दिली जाईल. पहिल्या टप्प्यातील १,००० फेरीवाल्यांना १ कोटी रुपये मिळणार आहेत.
पोल्ट्री शेडच्या नुकसानीसाठी प्रति शेड ५ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.
पूरामुळे नुकसान झालेल्या मासेमारीच्या बोटी, जाळी आणि उपजीविकेच्या इतर पात्र साधनांसाठीही शासनाच्या निकषांनुसार भरपाई दिली जाणार आहे.

*कुटुंबांसाठी वाढीव आर्थिक मदत*
पूरग्रस्त कुटुंबांना कपडे व घरगुती जीवनावश्यक वस्तूंच्या नुकसानीसाठीची मदत ५ हजारांवरून १५ हजार रुपये करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १५,८०२ लाभार्थ्यांसाठी मदत ७.९० कोटींवरून ३१.६० कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात ७,५०३ लाभार्थ्यांसाठी ३.०७ कोटींवरून १५ कोटी रुपये करण्यात आली आहे.
पूर्णपणे नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठीची मदत १.२० लाखांवरून १.५० लाख रुपये करण्यात आली आहे. किमान ५० टक्के नुकसान झालेल्या घरांना ५० हजार रुपये, २५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या घरांना २५ हजार रुपये, तर किमान १५ टक्के नुकसान झालेल्या घरांना १५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. पूर्णपणे नुकसान झालेल्या झोपड्यांसाठीची मदत ८ हजारांवरून १५ हजार रुपये करण्यात आली आहे.

*पशुधनालाही वाढीव मदत*
दुभत्या जनावरांच्या मृत्यूसाठीची मदत ३७,५०० रुपयांवरून ४० हजार रुपये करण्यात आली आहे. ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये, लहान जनावरांसाठी २० हजार रुपये मदत दिली जाईल. तसेच शेळ्या, मेंढ्या, डुकरे आणि कुक्कुटपालनातील पक्ष्यांच्या नुकसानीसाठीही शासनाच्या निकषांनुसार मदत मिळणार आहे.

*कारागीर आणि लघुउद्योगांचाही समावेश*
कारागीर, हातमाग कामगार, पारंपरिक हस्तकला व्यवसायिक, दुकानदार आणि स्टॉलधारक यांच्या नुकसानीसाठी पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्क्यांपर्यंत, विहित मर्यादेत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

*लाभार्थ्यांना आवाहन*
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी बाधित नागरिकांनी पंचनामा व पडताळणी प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करावे तसेच बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी, असे आवाहन केले आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मदत रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave Your Comments