प्रस्तावित एस्सार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर उसरणीत सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Date: 2026-08-03
news-banner

****प्रस्तावित एस्सार  प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर उसरणीत सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध****
**ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता पाहणी सुरू केल्याचा आरोप; पोलिसांच्या उपस्थितीत अधिकारी माघारी**
https://youtube.com/shorts/zsdlxdBWxZM?si=FDDM_cJ-7oomFb5B


पालघर | प्रतिनिधी
पालघर तालुक्यात प्रस्तावित एस्सार (ESSAR) प्रकल्पासाठी सुमारे १,२९५.४८ हेक्टर जमिनीच्या एकत्रित प्रस्तावाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी उसरणी गावात सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. ग्रामपंचायत अथवा स्थानिक ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सर्वेक्षण सुरू केल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी काम थांबविले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अखेर संबंधित अधिकारी व कर्मचारी कोणतेही सर्वेक्षण पूर्ण न करता माघारी परतले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्यासह अन्य कर्मचारी आणि संबंधित व्यक्ती उसरणी गावात सर्वेक्षणासाठी दाखल झाले होते. त्यांनी गावातील काही भागात प्राथमिक पाहणी सुरू केली. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सर्वेक्षणाचे कारण, अधिकृत आदेश आणि प्रकल्पाची माहिती विचारली. समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा दावा करत त्यांनी सर्वेक्षणास विरोध दर्शविला.

वाद वाढत गेल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, ग्रामस्थांचा विरोध कायम राहिल्याने अधिकारी आणि कर्मचारी तेथून निघून गेले. या वेळी उसरणीसह मथाणे, दांडा (उसरणी), खटाळी, भादवे आदी गावांतील नागरिकही मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

या घटनेची पार्श्वभूमी म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) १८ जून २०२६ रोजीच्या पत्रातून समोर आलेला प्रस्ताव होय. या पत्रानुसार उसरणी, दांडा (उसरणी), खटाळी, मधुकर नगर, मथाणे आणि भादवे या सहा गावांतील सुमारे १,२९५.४८ हेक्टर क्षेत्राचा M/s. ESSAR Capital Advisory India Pvt. Ltd. साठी एकत्रित जमीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव नेमका कोणत्या प्रकल्पासाठी आहे, कोणता उद्योग उभारला जाणार आहे किंवा अंतिम उद्देश काय आहे, याचा कोणताही स्पष्ट उल्लेख पत्रात करण्यात आलेला नाही.

विश्वसनीय सूत्रांनुसार, संबंधित परिसरात प्राथमिक पाहणी सुरू असल्याचे संकेत यापूर्वीही मिळाले होते. या प्रस्तावावर पुढे High Power Committee (HPC) स्तरावर विचार होणार असल्याची माहिती आहे. तथापि, शासन किंवा "एस्सार कंपनीने प्रस्तावित प्रकल्पाचे स्वरूप अद्याप अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही.

दरम्यान, आजच्या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले. सफाळे परिसरातील सर्व ग्रामपंचायती तसेच उसरणी, दांडा, खटाळी, भादवे आणि मथाणे गावांतील नागरिकांनी गाव, शेती, पर्यावरण आणि स्थानिक हिताच्या प्रश्नांवर एकत्र राहण्याची गरज व्यक्त केली. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती मिळवावी, कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यावी आणि गावाच्या हितासाठी संघटितपणे भूमिका घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

दरम्यान, आज उसरणी येथे नेमके कोणत्या विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत होते, त्याचा उद्देश काय होता आणि त्यासाठी आवश्यक प्रशासकीय परवानग्या कोणत्या होत्या, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Leave Your Comments

Trending News