चिंचघर-वाडा येथील इनोव्हेटर्स कंपनीतील घरफोडी उघड; तीन सराईत आरोपींसह भंगार विक्रेत्याला अटक

Date: 2026-08-25
news-banner

नवयुग पालघर

https://youtu.be/4QukO-Nb1tE?si=8QTqFZI7XAWsGIFC


***चिंचघर-वाडा येथील इनोव्हेटर्स कंपनीतील घरफोडी उघड; तीन सराईत आरोपींसह भंगार विक्रेत्याला अटक***

वाडा : चिंचघर येथील इनोव्हेटर्स कंपनीत घरफोडी करून सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी वाडा पोलिसांनी कारवाई करत तीन सराईत आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्याला अटक केली आहे. या आरोपींकडून वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून, तब्बल ५ लाख ४१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अजय शिवाजी सिंग (वय ५०), हे चिंचघर1 येथील इनोव्हेटर्स कंपनीत अॅडमिन व सिक्युरिटी ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मेंटेनन्स विभागाच्या पाठीमागील बाजूची जाळी व पत्रा कापून आत प्रवेश केला. टूल बॉक्सचे लॉक तोडून कॉपर केबलचे बंडल, मशीनच्या इलेक्ट्रिक मोटारी, इलेक्ट्रिक टेंगनर, ड्रिल मशीन, एसी दुरुस्तीचा टूल बॉक्स आणि कॉपर पाइप असा एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता.

याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारच्या घरफोड्या व चोऱ्या झाल्याने पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला.

तपासात विशाल विजय लोहार, सुरज प्रभाकर वाघ आणि तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा या चोरीतील सहभाग निष्पन्न झाला. चौकशीत त्यांनी चिंचघर, मांगाठणे, नारे, वडवली, खरीवली आणि उच्चाट परिसरात चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरीचा माल कुडूस येथील भंगार विक्रेता जफर मुनीर शेख याला विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर दोन आरोपींसह जफर शेख यालाही अटक करण्यात आली. चोरीतील १ लाख ६३ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या आरोपींनी सदर गुन्ह्यासह वाडा पोलीस ठाण्यातील आणखी पाच गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, सर्व सहा गुन्ह्यांतील मिळून ५ लाख ४१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि जव्हार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर,   सपोउपनि/दयानंद पाटील, सपोउपनि/गुरुनाथ गोतारणे, पोअं/दिलीप डगळे, पोअं/संतोष याकचौरे, पोअं/राजकुमार राख आदींच्या पथकाने केली आहे.


Leave Your Comments

Trending News