नवयुग पालघर
***विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध****
**नाव नसल्यास ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची संधी**
*पालघर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःसह कुटुंबातील सर्व मतदारांची नावे व तपशील तपासण्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे आवाहन*
1
पालघर, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision–SIR) प्रक्रियेंतर्गत महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने केवळ स्वतःचे नावच नव्हे, तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत आहे की नाही, याची काळजीपूर्वक पडताळणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
1
प्रारूप मतदार यादीत नाव आढळले नाही म्हणून पात्र मतदारांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवरील सुनावणी आणि त्यांचे निराकरण करण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
*केवळ नावच नव्हे, मतदार यादीतील संपूर्ण तपशील तपासा*
प्रारूप मतदार यादी तपासताना केवळ आपले नाव आहे की नाही, एवढेच पाहणे पुरेसे नाही. मतदारांनी यादीतील आपल्या नोंदीतील प्रत्येक महत्त्वाचा तपशील अचूक आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.
*मतदारांनी पुढील बाबी तपासाव्यात :*
*मतदाराचे नाव अचूक आहे का?
*वडिलांचे किंवा पतीचे नाव योग्य आहे का?
*वय किंवा जन्मतारीख बरोबर नोंदविली आहे का?
*लिंगाची नोंद योग्य आहे का?
*मतदाराचे छायाचित्र योग्य आहे का?
*पत्ता बरोबर आहे का?
*मतदार ओळखपत्र क्रमांक EPIC अचूक आहे का?
*मतदाराला नेमून दिलेले मतदान केंद्र योग्य आहे का?
यापैकी कोणत्याही तपशिलात चूक आढळल्यास ती दुरुस्त करून घेण्यासाठी विहित प्रक्रियेनुसार अर्ज करता येणार आहे.
*वृद्ध, स्थलांतरित आणि बाहेरगावी असलेल्या सदस्यांची नावे आवर्जून तपासा*
कुटुंबातील काही सदस्य शिक्षण किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असतील, काही सदस्य स्थलांतरित झाले असतील किंवा वृद्ध नागरिकांना प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रियेत अडचण आली असेल, तर अशा मतदारांची नावे कुटुंबीयांनी विशेष काळजीपूर्वक तपासावीत.
विशेषतः SIR प्रक्रियेदरम्यान ज्यांचे गणना प्रपत्र (Enumeration Form) भरले गेले नाही किंवा ज्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही, अशा मतदारांची नोंद प्रारूप मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
*प्रारूप यादीत नाव नाही? नमुना ६( Form 6)द्वारे दावा करता येणार*
प्रारूप मतदार यादी ही अंतिम मतदार यादी नसल्याने त्यात पात्र मतदाराचे नाव आढळले नाही म्हणून ‘आता काही करता येणार नाही’ असा गैरसमज करून घेऊ नये.
नवीन मतदार नोंदणीसाठी किंवा पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट झाले नसल्यास, आवश्यक कागदपत्रे व घोषणापत्रासह नमुना क्रमांक ६ (Form 6) द्वारे दावा सादर करता येणार आहे.
त्यामुळे प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी निर्धारित मुदतीत आवश्यक अर्ज दाखल करून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची संधी घ्यावी.
*नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलात चूक असल्यास नमुना क्रमांक 8 (Form 8)*
मतदाराचे नाव यादीत असले, तरी त्याच्या नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याचीही संधी उपलब्ध आहे.
नाव, पत्ता, वय किंवा जन्मतारीख, छायाचित्र अथवा अन्य मतदार तपशिलात चूक असल्यास नमुना क्रमांक ८ (Form 8) द्वारे दुरुस्तीचा अर्ज करता येईल.
त्यामुळे मतदारांनी प्रारूप यादीत आपली नोंद तपासताना केवळ नावाचा समावेश झाला आहे की नाही, एवढ्यावर न थांबता संपूर्ण नोंद काळजीपूर्वक तपासावी.
ASDD प्रवर्गातील मतदारांनी विशेष काळजी घ्यावी
पूर्वीच्या मतदार यादीत नाव असले, मात्र SIR प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार( Absent/Shifted/Dead/Duplicate) (ASDD) या प्रवर्गात नोंद झालेले मतदार किंवा ज्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही, अशा मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आवर्जून तपासावे.
आपण पात्र मतदार असल्यास संबंधितांनी उपलब्ध अधिकृत सुविधेद्वारे आपली स्थिती तपासावी. आवश्यक असल्यास विहित मुदतीत संबंधित अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
*प्रारूप मतदार यादी कुठे तपासता येईल?*
प्रारूप मतदार यादी आणि मतदार नोंदणीशी संबंधित माहिती पुढील ठिकाणी उपलब्ध आहे :
*महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ
*भारत निवडणूक आयोगाचे Voters’ Service Portal
*मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांचे कार्यालय
*सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे कार्यालय
*संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)
मतदारांना आपल्या मतदार यादीतील नोंदीबाबत माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास संबंधित BLO यांच्याकडूनही माहिती घेता येणार आहे.
*दावे किंवा दुरुस्ती अर्जासाठी कागदपत्रे तयार ठेवा*
नाव समाविष्ट करण्यासाठी दावा किंवा मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता असल्यास मतदारांनी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत.
यामध्ये लागू असलेले :
*ओळखीचे पुरावे
*वय किंवा जन्मतारखेचे पुरावे
*रहिवासाचे पुरावे
*२००२ च्या मतदार यादीतील उपलब्ध तपशील
यांचा समावेश होऊ शकतो.
मात्र नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची खात्री मतदारांनी अधिकृत निवडणूक पोर्टल किंवा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी.
‘**प्रारूप यादी म्हणजे दुरुस्तीची संधी’**
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास मतदारांनी घाबरून जाऊ नये. ही अंतिम मतदार यादी नसून पात्र मतदारांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे.
प्रत्येक नागरिकाने स्वतःचे तसेच कुटुंबातील सर्व पात्र मतदारांचे नाव, पत्ता, वय, छायाचित्र, मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासावी. काही त्रुटी किंवा नाव वगळलेले आढळल्यास शेवटच्या तारखेची वाट न पाहता विहित नमुन्यात तातडीने अर्ज सादर करावा, असे त्यांनी म्हटले आहे .
**महत्त्वाच्या तारखा :
*प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : ३१ ऑगस्ट २०२६
*दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६
*दावे-हरकतींची सुनावणी व निराकरण : ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६
*अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : ४ नोव्हेंबर २०२६
“३१ ऑगस्ट हा आपल्या मताधिकाराची नोंद तपासून आवश्यक दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव आवर्जून तपासावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.