पालघर-डहाणूच्या दुर्गम भागात आता आरोग्यसेवा थेट गावाच्या वेशीवर*** **लुपिन फाउंडेशनकडून चौथी मोबाइल मेडिकल व्हॅन; ६ लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार लाभ

Date: 2026-09-01
news-banner

नवयुग पालघर
***पालघर-डहाणूच्या दुर्गम भागात आता आरोग्यसेवा थेट गावाच्या वेशीवर***
**लुपिन फाउंडेशनकडून चौथी मोबाइल मेडिकल व्हॅन; 
६ लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार लाभ**

पालघर, दि. १ सप्टेंबर २०२६ :  पालघर आणि डहाणू तालुक्यांतील गावांमध्ये आता फिरत्या वैद्यकीय वाहनाच्या(मोबाइल मेडिकल व्हॅन) माध्यमातून आरोग्यसेवा थेट पोहोचणार आहे. लुपिन लिमिटेडच्या कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR )लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने पालघर जिल्ह्याला चौथे "फिरते वैद्यकीय वाहन उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेमुळे दोन्ही तालुक्यांतील ६ लाखांहून अधिक नागरिकांना प्राथमिक तपासणी, आजारांचे लवकर निदान, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपचारांची सुविधा अपेक्षित असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

या फिरत्या वैद्यकीय वाहनाचे लोकार्पण जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, लुपिन फाउंडेशनच्या कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचे प्रमुख तुषारा शंकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी आणि लुपिनचे तारापूर येथील जनरल मॅनेजर राजेंद्र फिरके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा साथ रोगतज्ज्ञ डॉ. अजय ठाकरे आणि तलासरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते.

LIVeS कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात उपलब्ध झालेली हे  चौथे वाहन आहे. यापूर्वीच्या तीन वाहनांच्या माध्यमातून पालघर-डहाणू, विक्रमगड-तलासरी आणि जव्हार-वाडा या तालुक्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जात आहे. नव्या वाहनामुळे विशेषतः आरोग्य सुविधा सहज उपलब्ध नसलेल्या गावांमधील नागरिकांना तपासणी आणि उपचारासाठी दूरच्या आरोग्य केंद्रांवर जाण्याची गरज कमी होणार आहे.

या  फिरत्या वैद्यकीय वाहनाच्या माध्यमातून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, दीर्घकालीन अडथळा आणणारे फुफ्फुसांचे आजार (COPD) तसेच इतर असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान आणि व्यवस्थापनावर भर देण्यात येणार आहे. नियमित तपासणीद्वारे आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करणे, वैद्यकीय सल्ला व आवश्यक उपचार देणे आणि गरजेनुसार रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय आरोग्य संस्थांकडे संदर्भित करणे, अशी या सेवेची कार्यपद्धती असेल असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये राबविण्यात येत असलेल्या LIVeS कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ६७३ गावांमधील २ लाख ९७ हजार २८२ हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच १,२०० हून अधिक मोफत वैद्यकीय शिबिरे घेण्यात आली असून, १ लाख ३ हजार ९८४ हून अधिक रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

यावेळी नचिकेत सुळे, आनंद दळवी, अक्षय कुलकर्णी, अभिषेक कुमार, नाजीम पठाण, कृष्णा बाजारे, डहाणू व तलासरी तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच लुपिन फाउंडेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave Your Comments