साधी शिधापत्रिका, तरीही ३ हजारांची लाच! डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा गोदाम लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Date: 2026-09-03
news-banner
नवयुग पालघर
****साधी शिधापत्रिका, तरीही ३ हजारांची लाच!
डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा गोदाम लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात****

डहाणू : शिधापत्रिका काढून देण्यासाठी नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात समोर आला आहे. आठ शिधापत्रिका काढून देण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ४ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या गोदाम लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
सचिन बाळासो व्हरगर (वय ३२) असे कारवाई करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. ते डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गोदाम लिपिक पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार हे नागरिकांना शिधापत्रिका काढून देण्यासाठी मदत करतात. याच कामासाठी ते डहाणू येथील शिधापत्रिका कार्यालयातील कर्मचारी सचिन व्हरगर यांच्या संपर्कात आले होते. आठ शिधापत्रिका काढून देण्यासाठी व्हरगर यांनी प्रति शिधापत्रिका ५०० रुपये, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार एकूण ४ हजार रुपयांची लाच मागण्यात आली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ ऑगस्ट २०२६ रोजी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची १८ ऑगस्ट तसेच २ सप्टेंबर रोजी कायदेशीर पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे.
त्यानंतर २ सप्टेंबर रोजी डहाणू तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून सहा शिधापत्रिकांसाठी ३ हजार रुपये स्वीकारताना सचिन व्हरगर यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सांगितले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस निरीक्षक राकेश डांगे पोहवा / प्रकाश दळवी, आकाश लोहारे, जितेंद्र गवळे यांच्या पथकाने केली.
#नवयुगपालघर #पालघर #डहाणू #लाचखोरी #ACB #लाचलुचपत #शिधापत्रिका #तहसीलकार्यालय #भ्रष्टाचारविरोधी #PalgharNews #Dahanu

Leave Your Comments