नवयुग पालघर
https://youtu.be/br6SFHOpGgQ?si=fkqBI1S2sGhKr6Ob
**परराज्यातील मद्य तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई; १२६ बॉक्ससह दोन वाहने जप्त**
पालघर जिल्ह्यात परराज्यातील मद्याची बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभाग आणि भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत विदेशी मद्याचे १२६ बॉक्स आणि दोन वाहने जप्त केली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, लगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मद्य तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिवसरात्र गस्त आणि करडी नजर ठेवण्यात येत होती. त्यानुसार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डहाणू येथील सुनील देशमुख आणि भरारी पथक, पालघरचे निरीक्षक अरुण चव्हाण यांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली.
पहिली कारवाई तलासरी-चारोटी रस्त्यावरील धुंदलवाडी शिवार, ता. तलासरी येथे करण्यात आली. यावेळी मारुती सुझुकी स्विफ्ट (क्र. DN-09/E-2152) या वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात प्रतिबंधित आणि दादरा नगर हवेली, दमण व दीव येथे विक्रीस असलेला मद्यसाठा आढळला.
दुसरी कारवाई मु.पो. आंबेसरी, ता. डहाणू येथे करण्यात आली. येथे महिंद्रा मॅक्स पिकअप (क्र. DD-01/AL-9615) या वाहनाची तपासणी केली असता परराज्यातील अवैध मद्यसाठा आढळून आला.
जप्त मुद्देमालाची किंमत
परराज्यातील अवैध मद्याची किंमत : ₹१४,२५,४८०
मारुती सुझुकी स्विफ्ट वाहन : ₹४,५०,०००
महिंद्रा मॅक्स पिकअप वाहन : ₹१३,५०,०००
दोन्ही वाहनांची एकत्रित किंमत : ₹१८,००,०००
मद्य व वाहनांसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत : ₹३२,२५,४८०
जप्त करण्यात आलेला १२६ बॉक्स विदेशी मद्यसाठा दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठी असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरचे अधीक्षक गणेश बारगजे आणि उपअधीक्षक अविनाश रणपीसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील देशमुख, निरीक्षक अरुण चव्हाण यांच्यासह दुय्यम निरीक्षक राजेश एस. शिंदे, विश्वजीत एम. आभाळे, अभिजीत मानकर, टी. व्ही. सावेकर तसेच जवान आणि वाहनचालकांसह अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुनील देशमुख, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डहाणू आणि अभिजीत मानकर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक पालघर करीत आहेत.