वाढवण बंदर विरोधातल्या आंदोलनात सहभागी होण्याचे मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांचे सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन

Date: 2026-09-08
news-banner

नवयुग पालघर 
*वाढवण बंदर विरोधातल्या आंदोलनात सहभागी होण्याचे मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांचे सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन*

वाढवण आणि मुरबे या दोन बंदरांच्या विरोधामध्ये पालघर जिल्ह्यात प्रचंड असंतोष आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनाला जवळपास चाळीस दिवस होत आले आहेत. अशा परिस्थितीत नागरी समाजाच्या ह्या लढ्याला राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळावा यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि ह्या लढ्यातील एक सहकारी डॉ. दीपक पवार यांनी विविध राजकीय पक्ष प्रमुखांना पत्र लिहून येत्या बुधवारी दि. ०९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता वाढवणजवळ वरोर येथील धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, रासपचे महादेव जानकर, माकपचे कॉ.अजित नवले, राजन राजे,कॉ.सुभाष लांडे, जनता दलाचे प्रभाकर नारकर, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, शिक्षक भारतीचे कपिल पाटील आदी नेत्यांना व्यक्तिशः पत्र लिहून बुधवारच्या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली आहे. 

डॉ दीपक पवार आपल्या पत्रात लिहितात की, डहाणूमधल्या औष्णिक प्रकल्पापासून ते विरारपर्यंतचा समुद्रकिनारा आणि तिथली परिसंस्था उद्ध्वस्त करण्याची एक तथाकथित विकासमालिका महाराष्ट्राच्या इन्फ्रामॅनने पालघर जिल्ह्याच्या बोकांडी मारली आहे. रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गानंतर पालघरही विकासाच्या नावावर उद्ध्वस्तीकरणाची प्रयोगशाळा बनू लागला आहे. पालघर तर इतकं धोक्यात आहे की बुलेट ट्रेन , ग्रीनफिल्ड मार्ग आणि इतर सर्व विकासप्रकल्पांमुळे हा प्रदेश कागदोपत्री महाराष्ट्रात राहील पण प्रत्यक्षात गुजरातसाठी मार्ग खुला करेल.
 महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचे एकमेकांशी काहीही मतभेद असतील पण स्थानिक जनतेच्या विरोधात जाऊन लादलेल्या अशा  प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची मराठी ओळखच  पुसली जाणार असेल तर  नागरी समाजाच्या आंदोलनाला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे. विकासाच्या नावाखाली संपूर्ण पालघर आणि कोकणाचं  बकालीकरण आणि भणंगीकरण करणं हाच पाशवी बहुमतवाल्या लोकांचा एकमेव अजेंडा आहे. त्याला विरोध ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे असे डॉ.पवार  म्हणतात.

नागरी समाजातल्या लोकांनी विचारपूर्वक आणि चिवटपणाने आंदोलन उभं केलं की राजकीय पक्ष त्यातून योग्य तो धडा घेतात आणि ताकदीने आंदोलन उभं करतात असा अनुभव आहे. जग जवळ येत आहे, भांडवली विकास थांबवता येणार नाही, भरपाई मागून बघू, आम्ही आदिवासींचे नेते आहोत तर आदिवासींपुरतं बघू, आम्ही मच्छीमारांचे नेते आहोत तर मच्छीमारांपुरतं बघू, असे युक्तिवाद गेल्या काही महिन्यात अनेकांनी करुन झाले आहेत. पण ते कुचकामी आहेत.  ‘मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसांच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या लढ्यात सहभागी होणं आणि सक्रिय पाठिंबा देणं हे काम आपण व आपल्या सहकाऱ्यांनी केलं आहे असंही डॉ पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

येत्या बुधवारी म्हणजे ०९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता वाढवण जवळ वरोर येथे धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण यावं अशी या संघर्षसमितीचा सहप्रवासी म्हणून मी आपल्याला विनंती करतो असे डॉ.पवार यांनी या पत्रात म्हटले आहे . 

नारायण पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी स्थानिक स्त्री-पुरुषांसहीत जिद्दीने ही लढाई लढत आहेत. योग्य वेळी त्यांच्या मागे उभे राहून देशातल्या, देशाबाहेरच्या भांडवलाचं आणि त्यामधून उभं राहणा-या मोजक्या लोकांच्या विकासाचं धनदांडगेकेंद्री मॉडल मोडून काढणं हे मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्मासाठी आवश्यक असल्याचे डॉ दीपक पवार यांनी म्हटले आहे.

Leave Your Comments