वाड्याची प्रतिक्षा भानुशाली राज्यस्तरीय पाककला स्पर्धेत अव्वल; थायलंड सफरीचे बक्षीस
वाडा : राज्यस्तरीय पाककला स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाडा केंद्रातील प्रतिक्षा भानुशाली यांनी तब्बल ५९ स्पर्धकांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशासोबतच त्यांना थायलंडची मोफत सफर आणि अन्य अनेक बक्षिसे मिळाली. ग्रामीण भागातील महिलेने राज्यस्तरीय व्यासपीठावर मिळवलेल्या या यशामुळे वाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्रावण महोत्सवाच्या संकल्पिका उत्तरा मोने यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पाककला स्पर्धेचे यंदा प्रथमच वाड्यात केंद्र सुरू करण्यात आले. शिवसेना उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे यांच्या स्वमहिला सर्वांगीण उन्नती फाऊंडेशनच्या माध्यमातून पालघरमध्ये गेल्यावर्षीपासून, तर यंदा प्रथमच वाड्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील महिलांनाही आपल्या पाककौशल्याला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने डॉ. ज्योती ठाकरे यांनी वाडा केंद्रासाठी सातत्याने पाठपुरावा केला. वाड्यातील खराब रस्ते आणि रेल्वेसेवेचा अभाव यामुळे सुरुवातीला वाडा केंद्र सुरू करण्याबाबत अनुकूलता नव्हती. मात्र, स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक अटी पूर्ण करून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि वाड्यातील महिलांसाठी ही निःशुल्क स्पर्धा खुली झाली.
स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ ऑगस्ट रोजी वाड्यात, तर २१ ऑगस्ट रोजी पालघरमध्ये झाली. राज्यातील विविध १२ केंद्रांवर प्राथमिक फेऱ्या घेण्यात आल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी मुंबईतील दादर येथील सावरकर सभागृहात अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत ५९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात प्रतिक्षा भानुशाली यांनी सर्वांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला.
दरम्यान, पालघर केंद्रातील महिलांनीही यंदाच्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. गेल्यावर्षी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते पालघर केंद्राचा शुभारंभ झाला होता. यंदा या केंद्रातील तीन महिला सर्वोत्तम २० स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या. सिद्धाली सावे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले, तर निता पाटील यांना जजेस चॉइस आणि प्रजक्ता पितळे यांना लक्षवेधी पाककला पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रतिक्षा भानुशाली तसेच वाडा आणि पालघर केंद्रातील महिलांनी मिळवलेल्या या शानदार यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
navyugpalghar.com
Instagram | Facebook | X | YouTube — Navyug Palghar
#नवयुगपालघर #NavyugPalghar #वाडा #पालघर #प्रतिक्षाभानुशाली #पाककलास्पर्धा #राज्यस्तरीयस्पर्धा #श्रावणमहोत्सव #महिलायश #महिलासक्षमीकरण #ThailandTrip #PalgharNews