नवयुग पालघर
****महावितरण नरमले; १५ दिवसांत वाढीव वीज बिलांची तपासणी****
**स्मार्ट मीटरविरोधात चारोटीत माकपचा एल्गार; मुंबई अहमदाबाद महामार्ग अडीच तास ठप्प**
चारोटी : जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये उद्यापासून १५ दिवसांची विशेष मोहीम राबवून वाढीव वीज बिलांची तपासणी व दुरुस्ती केली जाणार असून, स्मार्ट मीटर सक्तीने बसविले जाणार नाहीत, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर माकपने आंदोलन स्थगित केले. स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावर चारोटी येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर महावितरणला अखेर हे लेखी आश्वासन देणे भाग पडले.
डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे गुरुवारी (१० सप्टेंबर) माकपच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी रास्ता रोको केला. मुसळधार पावसाची पर्वा न करता आंदोलक ठिय्या देऊन राहिल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) सुमारे अडीच तास ठप्प झाला. या आंदोलनात ३५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाल्याचा दावा माकपने केला आहे.
जबरदस्तीने बसविण्यात येत असलेले स्मार्ट मीटर, त्यानंतर वाढल्याचा आरोप असलेली वीज बिले तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांची मनमानी आणि असंवेदनशील वर्तणूक यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर हा रास्ता रोको करण्यात आला.
आंदोलनात ठाणे-पालघर जिल्ह्यांतील अखिल भारतीय किसान सभा (AIKS), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA), डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. वाढीव वीज बिलांची तपासणी करून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी
१५ दिवसांची विशेष शिबिरे/मोहीम घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. तसेच स्मार्ट मीटर सक्तीने बसविणार नसल्याचेही आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
हजारो आंदोलकांमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असली तरी आपत्कालीन सेवांना अडथळा येऊ नये याची काळजी घेण्यात आली. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेला तातडीने मार्ग देण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले आणि जिल्हा सचिव किरण गहला यांनी केले. त्यांच्यासह रडका कलंगडा, लक्ष्मण डोंबरे, प्राची हातिवलेकर, लहानी दौडा, सुनीता शिंगडा, चंदू धांगडा, चंद्रकांत घोरखाना, यशवंत बुधर, गणेश दुमाडा, मनोज माढा, संजय वनसे, भास्कर म्हसे आणि राजेश दळवी सहभागी झाले.
दरम्यान, महावितरणने दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला. “रास्ता रोको हा आमचा लोकशाही हक्क आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर वेळ पडल्यास पश्चिम रेल्वे रोको करू. अटक झाली तरी संघर्ष थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
चारोटीतील या आंदोलनामुळे स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलांचा प्रश्न पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात ऐरणीवर आला असून, आता महावितरणच्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी कशी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नवयुग पालघर
F | X | Instagram | YouTube
#SmartMeter #LootingConsumers #Palghar #Dahanu #Charoti #CPIM #VinodNikole #AshokDhawale #Mahavitaran #ElectricityBill #PalgharNews #DahanuNews #Maharashtra #fbreels #fbpost