नवयुग पालघर
**कमी आणि अधिक वजनाकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज : जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड**
पालघर, दि. ९ सप्टेंबर २०२६ : “कमी वजन आणि अधिक वजन या दोन्ही समस्या कुपोषणाच्याच व्यापक स्वरूपाचा भाग आहेत. त्यामुळे या दोन्ही समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपण काय खातो, किती खातो आणि कोणत्या वेळी खातो, याबाबतही जागरूक असणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने जिल्हा परिषद, पालघर येथे ‘राष्ट्रीय पोषण माह २०२६’ निमित्त आयोजित तीन दिवसीय जनजागृती कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या २०२४ ते २०२९ या विकासाच्या आराखड्यात ‘सुरक्षित माता, सुसंस्कृत बालक आणि तरच घडणार समृद्ध महाराष्ट्र’ हा मूलभूत विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले. महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा परिषदेमार्फत माता आणि बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय कारणांमुळे वजनाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर दैनंदिन आहाराच्या सवयींबाबतही प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे असल्याचे डॉ. जाखड यांनी सांगितले.
बालकांचा सर्वांगीण विकास आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या बैठकीत आहाराच्या सवयींबाबत सखोल चर्चा झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले. अनेक ठिकाणी आहाराच्या चुकीच्या सवयी ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गर्भवती महिलांनी योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. तसेच बालकांना त्यांच्या गरजेनुसार दिवसातून नियमित आणि पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. काही ठिकाणी मुलांना आवश्यकतेपेक्षा कमी वेळा आहार दिला जात असल्याने या उणिवा भरून काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
माता-बाल आरोग्य आणि पोषणाच्या क्षेत्रात शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत करताना जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी या उपक्रमांमधून निश्चितच सकारात्मक परिणाम साध्य होतील, असा विश्वास व्यक्त केला. याचबरोबरीने, नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयींबाबत जागरूक राहून पोषण अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तीन दिवसीय जनजागृती कार्यक्रमात संतुलित आहार, कुपोषण निर्मूलन, माता-बाल आरोग्य, बालकांचा सर्वांगीण विकास आणि पोषण याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व महिला व बाल विकास विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.