पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहासाठी फेरनिविदा

Date: 2026-09-10
news-banner
नवयुग पालघर
**पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहासाठी फेरनिविदा**

             पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावरील उपहारगृह भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी तसेच कार्यालयातील विविध शासकीय कार्यक्रम आणि बैठकांना उपस्थित अभ्यागतांना खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक उपहारगृह चालक व कॅटरर्सकडून फेरनिविदा मागविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखा शाखेमार्फत फेरनिविदा सूचना क्रमांक ०३/२०२६ प्रसिद्ध करण्यात आली असून, ही प्रक्रिया ई-निविदेद्वारे राबविण्यात येत आहे. पालघर-बोईसर रोडवरील कोळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत हे उपहारगृह सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इच्छुक निविदाधारकांनी निविदा सादर करण्यापूर्वी निविदा दस्तऐवजातील सर्व अटी, नियम व शर्तींचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. निविदा सादर केल्यानंतर संबंधित निविदाधारकाने सर्व अटी व त्यांचे परिणाम समजून घेतले आहेत, असे गृहीत धरले जाणार आहे.

निविदा शुल्क तसेच इसारा रक्कम (ईएमडी) ऑनलाइन पद्धतीने भरून त्याची पावती स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहे. तांत्रिक निविदेसाठी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात तयार करून ब्रीफकेस-१ मध्ये, तर दरपत्रकाची पीडीएफ ब्रीफकेस-२ मध्ये अपलोड करावी लागणार आहे.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कागदपत्रांना कोणतीही वाढीव मुदत अथवा सवलत दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

या निविदेची अंदाजित रक्कम ५० लाख रुपये असून, ई-निविदा अर्ज शुल्क जीएसटीसह ५ हजार ९०० रुपये आहे. हे शुल्क परत केले जाणार नाही. इसारा अथवा बयाना रक्कम २ लाख रुपये, तर सुरक्षा अनामत रक्कम १० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

ई-निविदा प्रसिद्धी २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली आहे. निविदा भरण्याचा कालावधी २ सप्टेंबरपासून १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे.
तांत्रिक लिफाफा अर्थात फॉर्म क्रमांक ०१ १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता किंवा त्यानंतर उघडण्यात येणार आहे. निविदा उघडण्याचे ठिकाण निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांचे दालन असेल.

सविस्तर निविदा अटी व शर्ती www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुक निविदाधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथील लेखा शाखेशी तसेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave Your Comments