सफाळे रेल्वे स्थानकावर साचलेल्या पाण्यामुळे महिला प्रवाशाला दुखापत

Date: 2026-09-09
news-banner

नवयुग पालघर 

सफाळे रेल्वे स्थानकावर साचलेल्या पाण्यामुळे महिला प्रवाशाला  दुखापत

सफाळे : सफाळे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर साचलेल्या पाण्यामुळे ८ सप्टेंबर रोजी एका महिला प्रवाशाला दुखापत झाली. मुंबईहून येणारी, दादर येथून सायंकाळी ५.२२ वाजता सुटणारी लोकल सफाळे स्थानकात सायंकाळी सुमारे ६.३५ ते ६.४०च्या दरम्यान पोहोचली असताना हा प्रकार घडला. 

पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न होणे, प्लॅटफॉर्मवर पाणी साचणे आणि काही ठिकाणी अर्धवट उघडे असलेले छप्पर यामुळे प्रवाशांना निसरड्या प्लॅटफॉर्मवरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सफाळे स्थानकावरील समस्या केवळ पावसाळ्यापुरत्या मर्यादित नाहीत. लोकल वेळेवर मिळावी, रेल्वेच्या फेऱ्या नियमित असाव्यात, प्लॅटफॉर्मची देखभाल व्हावी, स्वच्छतागृहांसह मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रवाशांना वर्षानुवर्षे मागण्या कराव्या लागत आहेत. मात्र स्थानकावरील सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

रेल्वेच्या विलंबामुळे आधीच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यातच स्थानकावरील अस्वच्छता, साचलेले पाणी, निसरडे प्लॅटफॉर्म आणि अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ८ सप्टेंबरच्या घटनेनंतर या समस्यांकडे रेल्वे प्रशासन किती गांभीर्याने पाहणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्थानकावरील प्रवाशांच्या तक्रारींकडे स्टेशन मास्तर आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी कितपत गांभीर्याने लक्ष देतात, याबाबतही प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मात्र या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी नेमकी कोणाची आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन तातडीने कोणती पावले उचलणार, याचे उत्तर अपेक्षित आहे.

सफाळे स्थानकातील मूलभूत सुविधांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना स्थानिक आमदार आणि खासदार प्रवाशांच्या या समस्यांची कधी ठोस दखल घेणार, असा सवालही आता उपस्थित होत आहे.

Leave Your Comments