वाढवण-मुरबे बंदरासह अन्य प्रकल्पांविरोधात आता बहुजन विकास आघाडीही मैदानात

Date: 2026-09-08
news-banner

नवयुग पालघर 
**वाढवण-मुरबे बंदरासह अन्य प्रकल्पांविरोधात आता बहुजन विकास आघाडीही मैदानात**

पालघर : वाढवण बंदरासह जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांविरोधातील आंदोलनाला आता बहुजन विकास आघाडीही सक्रिय घेत मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढवण बंदर, मुरबे-जिंदाल जेट्टीसह स्थानिकांचे विस्थापन, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शेती-बागायती, पर्यटन व व्यवसायावर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता वऱोर नाका येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बहुजन विकास आघाडीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहनपत्रकात वाढवण बंदर, मुरबे जिंदाल जेट्टी, टोकराळे-केळवे रोड परिसरातील रिलायन्स टेक्स्टाईल पार्क, उसरणी-मथाणे-भादवे-दांडा-खटाळी-मधुकरनगर परिसरातील एस्सार एमआयडीसी, कोरे-दातिवरे विमानतळ तसेच उमरोळी-पडघे येथील भुयारी मार्ग अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे.

या प्रकल्पांमुळे स्थानिकांचे विस्थापन होण्याबरोबरच शेती, बागायती, पर्यटन, डायमेकिंग आणि स्थानिक व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे नेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वऱोर नाका येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाढवण बंदराच्या मुद्द्यावर यापूर्वी विविध स्थानिक संघटना आणि प्रकल्पग्रस्तांकडून धरणे आंदोलनासह वृक्षतोड आदींना नेटाने विरोध होत असताना, आता बहुजन विकास आघाडीनेही या प्रकल्पांविरोधात भूमिका घेत मैदानात उतरण्याची तयारी केल्याने जिल्ह्यातील प्रकल्पविरोधी आंदोलनाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave Your Comments