नवयुग पालघर
**कासा, विरार आणि बोईसर येथे अपर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्याचा निर्णय***
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, वसई आणि पालघर तालुक्यांमध्ये कासा, विरार आणि बोईसर येथे अपर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्यास शासनाने मान्यता दिली असून महसूल विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
या निर्णयामुळे संबंधित भागातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक जवळच्या ठिकाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तहसील कार्यालयावरील वाढता कामाचा ताण कमी करून महसुली कामकाजाला गती देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
*कासा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तीन महसूल मंडळे*
डहाणू तालुक्यातील कासा येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित होणार आहे. डहाणू तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात डहाणू, मल्याण, आशागड, चिंचणी, वाणगाव आणि आंबेसरी ही सहा महसूल मंडळे राहतील. तर कासा अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कासा, चारोटी आणि सायवन ही तीन महसूल मंडळे असतील.
*विरार कार्यालयात चार महसूल मंडळांचा समावेश*
वसई तालुक्यातील विरार येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. वसई तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वसई, पेल्हार, निर्मळ, माणिकपूर आणि कामण ही पाच महसूल मंडळे राहतील. विरार अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विरार, मांडवी, आगाशी आणि बोळींज या चार महसूल मंडळांचा समावेश असेल.
*बोईसर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात चार महसूल मंडळे*
पालघर तालुक्यातील बोईसर येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित होणार आहे. पालघर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पालघर, माहिम, आगरवाडी, सफाळे, कोळगाव आणि दहिसर तर्फे मनोर ही सहा महसूल मंडळे राहतील. तर बोईसर अपर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बोईसर, तारापूर, मनोर आणि लालोंडे या चार महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
*उपविभागीय अधिकारी प्रतिवेदन अधिकारी, जिल्हाधिकारी नियंत्रक अधिकारी*
कासा, विरार आणि बोईसर येथील अपर तहसीलदारांचे प्रतिवेदन अधिकारी संबंधित उपविभागीय अधिकारी, तर नियंत्रक अधिकारी जिल्हाधिकारी, पालघर असतील. अपर तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नवीन अपर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी असलेले अधिकार व कर्तव्ये अपर तहसीलदारांकडून पार पाडली जातील. मात्र संपूर्ण तालुक्याशी संबंधित इतर कामकाजाचे अधिकार मूळ तहसीलदार कार्यालयाकडेच राहतील.
निवडणूक, संजय गांधी निराधार योजना तसेच इतर अर्ज व निवेदने यांसारख्या महसुली कामकाजाव्यतिरिक्त बाबींमध्ये अपर तहसीलदार कार्यालयाने अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित तहसीलदार कार्यालयाकडे पाठवायचे आहेत.
१५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
कासा, विरार आणि बोईसर येथील अपर तहसीलदारांची पदस्थापना शासनस्तरावरून करण्यात येणार आहे. इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदस्थापना उपलब्ध अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करायची आहे.
नवीन कार्यालये सुरू करण्यासाठी सुरुवातीला तात्पुरती कार्यालयीन जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर कायमस्वरूपी जागा शोधून कार्यालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा लागणार आहे.
पदस्थापना आणि कार्यालयीन जागेबाबतच्या बाबींची पूर्तता करून त्याचा १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत शासनस्तरावरून कळविण्यात येणार आहे.
navyugpalghar.com
#पालघर #कासा #विरार #बोईसर #अपरतहसीलदार #महसूलविभाग #पालघरजिल्हा #महाराष्ट्रशासन #revenuedepartmentofmaharashtra #collectorpalghar