नवयुग पालघर
***सेवा संकल्प अभियानाचा प्रचार रथ मार्गस्थ; आदिवासी विकास योजनांची गावागावांत जनजागृती***
जव्हार : आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या शैक्षणिक, विकास, स्वयंरोजगार आणि कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रचार रथाचा शुभारंभ आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते करण्यात आला. प्रकल्प अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
।आमदार हरिश्चंद्र भोये यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रचार रथाला मार्गस्थ केले. या रथाच्या माध्यमातून दुर्गम आणि ग्रामीण भागातील गावागावांत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
योजनांची पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाकडून उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांना सुलभ पद्धतीने दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती वेळेत मिळून शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास मदत होणार आहे.
‘माहितीपासून लाभापर्यंत’ हा दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून हे अभियान राबविण्यात येत आहे. शासकीय योजना केवळ कागदावर न राहता प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या प्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, मच्छिंद्र गडाख, नियोजन अधिकारी सतीश रास्ते, लेखा अधिकारी ज्ञानदेव कचरे, कार्यालय अधीक्षक योगेश भोये आणि संशोधन सहायक ऋषिकेश डाकोरे यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
navyugpalghar.com
📲 Facebook | Instagram | YouTube | X | WhatsApp Channel
#सेवासंकल्पअभियान #जव्हार #आदिवासीविकास #शासकीययोजना #जनजागृती #पालघर #NavyugPalghar