कबड्डी स्पर्धेत सफाळ्याच्या कुर्लाई संघाचे दुहेरी यश*

Date: 2026-09-23
news-banner
नवयुग पालघर
***कबड्डी स्पर्धेत सफाळ्याच्या कुर्लाई संघाचे दुहेरी यश***

         तलासरी तालुक्यात प्रथमच मॅटवर रंगलेल्या २० वर्षांखालील कुमार-कुमारी गटातील कबड्डी स्पर्धेत सफाळे येथील कुर्लाई क्रीडा मंडळाने दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी विजय मिळवला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन, तलासरी तालुका कबड्डी असोसिएशन आणि सुफा फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने तलासरी येथील आदिवासी भवन व कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर सभागृहात कबड्डी निवड चाचणी व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
          कुमार गटात ४५, तर कुमारी गटात १५ संघांनी सहभाग नोंदवला. दोन्ही गटांत कुर्लाई क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांक मिळवत स्पर्धेवर आपली छाप पाडली. कुमार गटात श्रीराम कबड्डी संघ, विरार यांनी द्वितीय, युवा प्रतिष्ठान, विरार यांनी तृतीय, तर जय जेएमडी क्रीडा मंडळ, नालासोपारा यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. कुमारी गटात मोरया क्लब, अर्नाळा द्वितीय, साईकृपा वसरे संघ तृतीय, तर जीवन ज्योती होलोली संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.
          स्पर्धेचे उद्‌घाटन सुफा फार्मचे अध्यक्ष मोहनभाई पटेल यांच्या हस्ते झाले. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. पालघर जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रासाठी महत्त्‌वपूर्ण ठरलेल्या या स्पर्धेमुळे मॅटवरील खेळाचा अनुभव स्थानिक खेळाडूंना मिळाला. 
            २०२६-२७ या क्रीडा वर्षातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा विरार येथे मॅटवर आयोजित करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील खेळाडूंना आगामी स्पर्धांसाठी तयारीची संधी मिळणार आहे.

अधिक बातम्यांसाठी : www.navyugpalghar.com⁠
#नवयुगपालघर #कबड्डी #कबड्डीस्पर्धा #कुर्लाईक्रीडामंडळ #सफाळे #तलासरी #पालघर #Kabaddi #Palghar #Sports #KabaddiTournament

Leave Your Comments