आर्यनच्या शाळांमध्ये रोटरीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लासरूमसह शुद्ध पाण्याची सुविधा

Date: 2026-09-23
news-banner
नवयुग पालघर 
***आर्यनच्या शाळांमध्ये रोटरीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लासरूमसह शुद्ध पाण्याची सुविधा ***

पालघर :  आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या  म. नी. दांडेकर हायस्कूलमध्ये रोटरीच्या सहकार्याने पाच डिजिटल स्मार्ट क्लासरूम सुरू करण्यात आल्या असून, आर्यन इंग्लिश स्कूलमध्ये सुमारे एक हजार विद्यार्थ्यांसाठी RO प्लांट व वॉटर कूलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बेव्ह्यू आणि रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने म. नी. दांडेकर हायस्कूलमध्ये ‘स्मार्ट क्लासरूम’ प्रकल्प  अंतर्गत शाळेला पाच अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बेव्ह्यूच्या माजी अध्यक्षा सोनाली शहा आणि संचालिका विद्या मुरजानी यांच्या प्रमुख उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन झाले.

स्मार्ट बोर्डमुळे पाच वर्गखोल्यांमध्ये डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. विज्ञान, गणित, भूगोल यांसारखे विषय चित्रे, व्हिडिओ, ॲनिमेशन आणि डिजिटल शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे शिकवता येणार आहेत. 

या प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख व रोटरीचे डिस्ट्रिक्ट अव्हेन्यू चेअर भगवान पाटील यांनी समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष भूषण सावे, रफिक धडा, अमर बजपाई, गणेश घुगे, निनाद सावे, कुंदन म्हात्रे, यदुनाथ पाटील, आर्यन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी जयंत दांडेकर, स्कूल कमिटी अध्यक्ष उपेंद्र घरत, मुख्याध्यापिका विभूती चौधरी, शिक्षक प्रतिनिधी प्रज्ञा ठाकूर, सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष मिलिंद तांबे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका विभूती चौधरी यांनी स्मार्ट क्लासरूम प्रकल्पाचे महत्त्व सांगून रोटरी क्लबचे आभार मानले. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी स्वाती गुट्टे हिने विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. स्मार्ट बोर्डमुळे अवघड विषय सोपे समजण्यासोबतच इंग्रजी उच्चार, ऐकण्याचे कौशल्य आणि एकाग्रता वाढण्यास मदत होईल, असे तिने सांगितले.

प्रमुख पाहुण्या सोनाली शहा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्मार्ट बोर्डचा प्रभावी व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी करावा, असा संदेश त्यांनी दिला.

*आर्यन इंग्लिश स्कूलमध्ये RO प्लांट, वॉटर कूलर*
दरम्यान, आर्यन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी RO प्लांट आणि वॉटर कूलर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेचा लाभ शाळेतील सुमारे १,००० विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ पालघर, रोटरी क्लब ऑफ मुंबई मालाबार हिल, इनर व्हील क्लब ऑफ पालघर, इंटरॅक्ट क्लब ऑफ आर्यन स्कूल आणि आर्यन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने साकारण्यात आला.

या प्रकल्पाचे प्रकल्प अध्यक्ष रोटेरियन रफिक लुलानिया होते. विशेष म्हणजे, लुलानिया हे आर्यन इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबविता आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी अध्यक्ष निकिता कोठारी, माजी अध्यक्ष सुरेश डोंगरे, देणगीदार धैरेश संघवी, अध्यक्ष भूषण सावे, सचिव अमित पाटील, अध्यक्ष-निर्वाचित रफिक धाडा, माजी अध्यक्ष अजित दुबे, माजी अध्यक्ष अमित आर. पाटील, माजी अध्यक्ष मिलिंद यू., रोटेरियन कुंदन म्हात्रे घुघे सर तसेच रोटरी क्लब ऑफ मुंबई मालाबार हिलच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्ष अनुष्री आव्हाड,, सचिव मृदुला सावे आणि प्रकल्प अध्यक्षा शमिम लुलानिया यांच्यासह क्लबच्या सदस्यांनीही या उपक्रमात योगदान दिले.
आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केदार काळे, जयंत दांडेकर, किरण पाटील, पी. एन. पाटील, कमलेश वरैया, मुख्याध्यापिका सोनार मॅडम आणि शाळेच्या टीमने प्रकल्पासाठी सहकार्य केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि आयोजन आर्यन स्कूलच्या इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले.

🌐 navyugpalghar.com
#पालघर #आर्यनएज्युकेशन #SmartClassroom #DigitalEducation #ROPlant #RotaryClub #Palghar #Education #NavyugPalghar
Facebook | Instagram | X | YouTube: @NavyugPalghar

Leave Your Comments