नवयुग पालघर
**पात्र नागरिकांसाठी २६ व २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे; नवमतदारांसह यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नोंदणीची संधी****
पालघर जिल्ह्यातील मतदार यादीत अद्याप नाव नोंदविलेले नसलेल्या सर्व पात्र भारतीय नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करून विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision–SIR) 2026 मोहिमेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे. विशेषतः १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी तसेच पात्र असूनही मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार SIR-2026 कार्यक्रम राबविण्यात येत असून, पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यातही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील SIR-२०२६ संदर्भातील सूचना व माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
SIR-२०२६ च्या अनुषंगाने पात्र नागरिकांच्या सोयीसाठी पालघर जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांना त्यांच्या संबंधित मतदान केंद्रावर मतदार नोंदणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नमुना क्र. ६ (Form-6) द्वारे नोंदणी करण्यास मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, याची पडताळणी करता येणार असून, आवश्यक असल्यास मतदार यादीतील तपशील दुरुस्ती, निवासस्थानी स्थलांतर किंवा EPIC संदर्भातील बदलांसाठी अर्ज करता येणार आहे.
मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक अर्ज व कागदपत्रांबाबतही नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर नमुना ६( Form-6) हा नवीन मतदार म्हणून नाव समाविष्ट करण्यासाठी, तर नमुना ८ (Form-8) हा निवासस्थानी स्थलांतर, मतदार यादीतील तपशील दुरुस्ती, EPIC बदल आदींसाठी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती तसेच प्रथमच मतदार म्हणून पात्र ठरणाऱ्या नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करावी. पात्र असूनही नाव मतदार यादीत नसल्यास नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था तसेच नागरिकांनी आपल्या परिसरातील पात्र व्यक्तींना मतदार नोंदणीबाबत माहिती देऊन प्रशासनाच्या या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांना मतदान केंद्रावरील विशेष शिबिरासोबतच भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल Voters' Service Portal वरून ऑनलाइन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव शोधणे आणि अर्जाची स्थिती तपासणे यांसह विविध सुविधा उपलब्ध आहेत. आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर मतदार नोंदणी, मतदार यादीतील तपशील अद्ययावत करणे, अर्जाची स्थिती तपासणे तसेच मतदान केंद्र व "बूथ पातळीवरील अधिकारी( BLO) संदर्भातील माहिती मिळविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
SIR-2026 संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी, नाव शोधण्याची सुविधा, SIR हेल्पडेस्क तसेच SIR संदर्भातील सूचना आणि प्रश्नोत्तरांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. SIR संदर्भातील चौकशीसाठी 1950 ही हेल्पलाइनही उपलब्ध आहे.
“एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये”
“लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंदणी होणे महत्त्वाचे आहे. पालघर जिल्ह्यातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी तसेच पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा. दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिराला भेट देऊन नोंदणीची कार्यवाही पूर्ण करावी. नागरिकांनी स्वतः नोंदणी करण्याबरोबरच आपल्या कुटुंबातील व परिसरातील पात्र व्यक्तींनाही नोंदणीसाठी प्रोत्साहित करून प्रशासनास सहकार्य करावे. पालघर जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
navyugpalghar.com
#SIR2026 #मतदारनोंदणी #नवमतदार #मतदारयादी #पालघर #लोकशाही #मतदारहक्क