नवयुग पालघर
***२८ जूनला पालघर जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम; १.५६ लाख बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट***
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यात रविवार, २८ जून रोजी विशेष पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १ लाख ५६ हजार २८३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केल्याचे म्हटले असून, यासाठी २,२३८ लसीकरण केंद्रे, ४,९१८ कर्मचारी व स्वयंसेवक तसेच ४३७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिओमुक्त समाज घडविण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, शासकीय रुग्णालये, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. २८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पात्र बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत.
मोहीमेच्या दिवशी काही कारणास्तव लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी २८ ते ३० जूनदरम्यान विशेष घरभेट मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य विभागाची पथके घरोघरी जाऊन पात्र बालकांना लसीचा डोस देणार आहेत.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी १६ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे तसेच प्रत्येक केंद्रावर वेळेपूर्वी लसीचा पुरवठा उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वैदेही माळवी यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण आणि स्थानिक प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पालकांना आपल्या पाच वर्षांखालील बालकांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन “पोलिओचे दोन थेंब – आयुष्यभराचे संरक्षण” या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पोलिओच्या संपूर्ण उच्चाटनासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.