पालघरच्या १,२०० शाळा होणार ‘संपर्क स्मार्ट शाळा’; १,५६१ डिव्हाइसेस आणि १,००५ एलईडी टीव्हींचे वितरण

Date: 2026-11-03
news-banner

नवयुग पालघर
****पालघरच्या १,२०० शाळा होणार ‘संपर्क स्मार्ट शाळा’; १,५६१ डिव्हाइसेस आणि १,००५ एलईडी टीव्हींचे वितरण
डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्यावर भर; ‘निपुण पालघर’ अभियानाला बळ****

पालघर, दि. २२ ऑक्टोबर २०२६ : पालघर जिल्ह्यातील १,२०० शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद पालघरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने संपर्क फाउंडेशनच्या सहकार्याने या शाळांना १,५६१ संपर्क डिव्हाइसेस आणि १,००५ एलईडी टीव्हींचे वितरण केले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून गणित, इंग्रजी आणि इतर मूलभूत संकल्पना अधिक सोप्या व रंजक पद्धतीने शिकता येणार आहेत.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करून त्यांना अध्ययनाच्या दृष्टीने सक्षम बनविण्याच्या उद्देशाने ‘निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून, शिक्षकांच्या कृती पुस्तिकांवर आधारित अध्यापन अधिक कृतीशील, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यावर भर दिला जात आहे.

*मागील वर्षी ५७ टक्के विद्यार्थी निपुण*
निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, आकलन आणि संख्याज्ञानाची मूलभूत कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी शिक्षक कृती पुस्तिकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील ५७ टक्के विद्यार्थी निपुण झाले होते. आता उर्वरित विद्यार्थ्यांनाही अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यासाठी कृती पुस्तिकांमधील उपक्रमांना पूरक म्हणून डिजिटल शैक्षणिक साहित्याचा वापर केला जाणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून कठीण संकल्पना समजावून सांगणे, विद्यार्थ्यांना नियमित सरावाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि वर्गातील अध्ययन प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, यासाठी संपर्क डिव्हाइसेस आणि एलईडी टीव्हींचा उपयोग होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक अभिजित लोहकरे कार्यरत आहेत. शाळांपर्यंत डिजिटल साधने पोहोचविणे, शिक्षकांना तंत्रज्ञानाधारित अध्यापनासाठी सहकार्य करणे आणि उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी समन्वय साधला जात आहे.

“पालघर जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि त्याची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाची क्षमता विकसित व्हावी, हे निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियानाचे उद्दिष्ट आहे. संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमामुळे कृती पुस्तिकांवर आधारित अध्यापनाला डिजिटल साहित्याची जोड मिळणार आहे. शिक्षकांनी उपलब्ध साधनांचा नियमित आणि परिणामकारक वापर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, सराव आणि आनंददायी अध्ययनाच्या संधी द्याव्यात. सर्व विद्यार्थ्यांना निपुण करण्यासाठी शाळांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.

प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनीही विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीवर भर दिला. मागील वर्षी निपुण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रगती कायम राखण्यासोबतच उर्वरित विद्यार्थ्यांना निपुण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी कृती पुस्तिका आणि डिजिटल शैक्षणिक साहित्याचा समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या अध्ययन गरजांनुसार अध्यापन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Leave Your Comments