सप्टेंबर २०२५ पासून ऑक्टोबर २०२६ उजाडला, तरी पालघरमधील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत?

Date: 2026-11-03
news-banner

****सप्टेंबर २०२५ पासून ऑक्टोबर २०२६ उजाडला, तरी पालघरमधील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत?****

चौथी यादी जाहीर; १२,३५१ पात्र शेतकऱ्यांपैकी २,३२३ जणांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित

पालघर, दि. २३ ऑक्टोबर २०२६ : सप्टेंबर २०२५ मध्ये थकीत पीककर्जाच्या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर ऑक्टोबर २०२६ उजाडला, तरी पालघर जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचलेला नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यात चार याद्या जाहीर करण्यात आल्या असून, १२,३५१ पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ८,३१० शेतकऱ्यांना ४७ कोटी ३७ लाख रुपयांचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, २,३२३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित असल्याने त्यांना लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना जाहीर केली होती. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड करू न शकलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची तरतूद आहे. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही नियोजन आहे.

मात्र, योजनेची घोषणा आणि प्रत्यक्ष लाभाचे वितरण यामध्ये मोठा कालावधी गेल्याने पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची प्रक्रिया कितपत पूर्ण झाली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

चार याद्यांमध्ये १२,३५१ शेतकरी पात्र

पालघर जिल्ह्यात या योजनेंतर्गत यापूर्वी १० हजार ४४४ शेतकऱ्यांची पहिली यादी, ४७९ शेतकऱ्यांची दुसरी यादी आणि २०६ शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२६ रोजी १,१९१ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी जाहीर करण्यात आली.

या चारही याद्यांमध्ये एकूण १२,३५१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी १०,०२८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून, २,३२३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची गरज आहे.

८,३१० शेतकऱ्यांना ४७.३७ कोटींचे वितरण

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या यादीतील ५,१६९ शेतकऱ्यांना २९ कोटी २० लाख ४३ हजार रुपये, दुसऱ्या यादीतील २,६१५ शेतकऱ्यांना १४ कोटी ८१ लाख ७१ हजार २२४ रुपये, तर तिसऱ्या यादीतील ५२६ शेतकऱ्यांना ३ कोटी ३५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

या आकडेवारीनुसार पहिल्या तीन याद्यांतील ८,३१० शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. मात्र, चौथी यादी जाहीर होऊनही पात्र ठरलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यातील २,३२३ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी केले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

 navyugpalghar.com

#Palghar #पालघर #शेतकरी #कर्जमाफी #शेतकरीकर्जमुक्ती #Maharashtra #NavyugPalghar

Follow: F/X | Instagram | YouTube


Leave Your Comments