पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था चिंताजनक - भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांचे निरिक्षण

Date: 2026-03-06
news-banner

नवयुग पालघर विशेष :

पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था चिंताजनक - भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांचे निरिक्षण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांनी अलिकडच्या काळात पालघर जिल्ह्यास वेगवेगळ्या कारणास्तव भेट दिली आहे. जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गणेश नाईक यांच्यातर्फे आतापर्यंत तीन जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे, खासदार डॉ. हेमंत सवरा यांनीही अलिकडेच जनता दरबार आयोजित केला होता. जिल्हावासियांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने हे सारे नेते प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा सेंटर, जव्हार उप जिल्हा रुग्णालय, जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, रोजगार आदि मुलभुत प्रश्नांकडे सरकारचे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. सत्ताधारी आमदारांमार्फत वरिष्ठ पातळीवर गेली अनेक वर्षे हे प्रश्न मांडले जात असूनही आवश्यक निधी उपलब्ध केला जात नाही. परिणामी सत्ताधारी आमदारांनाच विधीमंडळात या प्रश्नांना वाचा फोडावी लागली. मात्र यातूनही फारसे काही हाती लागले नाही.आमदार चित्रा वाघ व आमदार स्नेहा दुबे-पंडित-यांनी विधीमंडळात यासंबंधात मांडलेली  कैफियत त्यांच्याच शब्दात :


मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि आरोग्यमंत्री यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक चांगली कामे सुरू आहेत.  परंतु तीन दिवस पालघर जिल्ह्यात वास्तव्यास राहून प्रत्यक्ष पाहिलेली परिस्थिती चिंताजनक आहे. हे म्हणणे आहे आमदार चित्रा वाघ यांचे आणि त्यांनी ते स्पष्टपणे मांडले, विधानपरिषदेत.
२०१४ पासून पालघर येथे सुरू असलेले ट्रॉमा सेंटरचे काम आजही अपूर्ण असून परिणामी संपूर्ण ताण कॉटेज हॉस्पिटलवर पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात झाल्यास तात्काळ उपचारासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले 

 आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना शेजारील गुजरात राज्य किंवा सिल्वासा येथे जावे लागते.  परंतु तेथे आयुष्मान भारत / महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा लागू होत नाही   त्यामुळे आपल्या राज्यातील नागरिकांना तिथे उपचार मिळत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली.

अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरता. उपलब्ध डॉक्टरांकडे अतिरिक्त कार्यभार. यामुळे आशागड, मासवणसारख्या घटना घडतात आणि ही केवळ प्रशासकीय बाब नाही, तर लोकांच्या जीविताशी निगडित प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या म्हणतात, माझी भूमिका स्पष्ट आहे , सरकार चांगले काम करत आहे पण ते पालघरपर्यंत पोहचलेलं नाही. म्हणूनच पालघरमधील मोडकळीस आलेली आरोग्य व्यवस्था उभी करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत ; डॉक्टरांची  रिक्त पदे भरावीत ; दुर्गम भागात विशेष आरोग्य बळकटीकरण योजना राबवावी ; अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करावी या  त्यांच्या मागण्या राहिल्या.

पालघरकरांना त्यांच्या जिल्ह्यातच सक्षम, सुरक्षित आणि सन्मानजनक आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, हीच माझी आग्रही मागणी. मी आशा करते की राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी मी उपस्थित केलेल्या या प्रश्नाकडे शासन गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करेल आणि पालघरमधील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व परिणामकारक करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
       त्या म्हणतात, पालघर जिल्ह्यातील तीन दिवसांच्या दौर्‍यात अंगणवाडी व्यवस्थेबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या आणि त्या मी विधान परिषदेत ठामपणे मांडल्या. 

काही अंगणवाड्या ग्रामपंचायतीकडून नगरपालिका/नगरपरिषदेकडे गेल्या, पण त्यांचे हस्तांतरण अद्याप पूर्ण नाही. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
         जिल्ह्यात सुमारे १३० अंगणवाड्या ;५८ स्वत:च्या इमारती ; ९ भाडेतत्त्वावर ;२५ नादुरुस्त , काही  ठिकाणी ओट्यावर, अंगणात वर्ग भरवले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
     दर महिन्याला घरपोच शिधा पोचणे अपेक्षित आहे.  मात्र हा शिधा दोन महिन्यांनी दिला जातो. त्यातही तूरडाळ, तांदूळ, तेल मिक्स करून दिलेल्या आहाराला उग्र वास येतो; चव खारट आहे, जो महिलांकडून खाल्ला जात नाही किंबहुना  फेकण्यात येतो,हे वास्तव त्येंनी समोर आणले आहे.
         त्या पुढे म्हणताता, प्रोटीन पावडरमध्ये गुठळ्या आहेत. ; वय वर्ष ३ ते ६ बालकांना ८७ ग्रॅम खिचडी देण्यात येते, ज्याचा कच्चा आहार  शासनाकडून दिला जातो. ज्यात वाटाणे (कडधान्य) दिले जातात, जे भिजत नाहीत ; आहार बनवण्यासाठी २०१६ मध्ये दिलेल्या शेगड्या अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत. मॉडर्न अंगणवाडीमध्ये अद्ययावत किचन येईलही त्याचे स्वागत आहे, पण ज्या ठिकाणी अंगणवाड्या नादुरुस्त आहेत, भाडेतत्त्‌वावर आहेत किंवा मूलभूत सुविधा नाही तिथलं काय ? असा सवाल त्यांनी उपfस्थत केला आहे.

मुख्य म्हणजे वरील मुद्दे हे ऐकीव किंवा सांगीव माहिती नाही तर मी प्रत्यक्ष पाहणी करून मांडलेली वस्तुस्थिती असल्याचे त्या आवर्जुन  सांगतात.

राज्यातील प्रत्येक बालकाला, महिलेला दर्जेदार, सुरक्षित आणि पोषणयुक्त आहार मिळणे ही आमची जबाबदारी आहे असे सांगत, मी सभागृहात यासंबंधी खालील प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  नादुरुस्त अंगणवाड्यांसाठी निधी कधी ? ; आहाराच्या गुणवत्तेबाबत सुधारणा कधी? सर्व अंगणवाड्यांपर्यंत आधुनिक सुविधा कधी?
या माझ्या प्रश्नांवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक उत्तर दिल्याचे सांगून येत्या काळात लवकरच पालघर जिल्ह्यातील तसेच राज्यातील अंगणवाड्यांचे चित्र बदलेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave Your Comments