विराज प्रोफाइलमधील वरिष्ठ अधिकार्‍याची आत्महत्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर छळाचा आरोप

Date: 2026-06-26
news-banner
नवयुग पालघर

***विराज प्रोफाइलमधील वरिष्ठ अधिकार्‍याची आत्महत्या
 मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर छळाचा आरोप***

        तारापूर औद्योगिक परिसरातील विराज प्रोफाइल या स्टील उत्पादन करणार्‍या कंपनीतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर (सीईओ) मानसिक छळ केल्याचा गंभीर  आरोप करण्यात आला असून बोईसर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
         मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत इलेक्ट्रिकल संचालक  म्हणून कार्यरत असलेले प्रदीप जाधव यांनी १९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास बोईसर पूर्व येथील रूपरजत पार्कमधील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. घरात काम करणार्‍या स्वयंपाकी गजानन यांनी ही घटना सर्वप्रथम पाहिली. त्यांनी तत्काळ जाधव यांचे पुत्र यश जाधव यांना संपर्क साधून माहिती दिली.
        घटनेच्या वेळी यश जाधव आणि त्यांची आई वंदना जाधव मुंबईत असल्याने ते रात्री उशिरा बोईसरला पोहोचले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. बोईसर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
             तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक मोबाईल फोन आणि डायरी लागली असून त्यामध्ये प्रदीप जाधव यांनी लिहिल्याचे सांगितले जाणारे एक पत्र आढळून आले आहे. या पत्रात कंपनीचे सीईओ जे. पी. गर्ग यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या छळामुळेच टोकाचा निर्णय घेतल्याचे त्या पत्रात नमूद असल्याचे सांगितले जाते.  दरम्यान, प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव  यांनी दिलेल्या  तक्रारीवरून बोईसर पोलिसांनी जे. पी. गर्ग  यांच्याविरोधात आत्महत्येस  प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाबाबत बोईसर  पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी सांगितले की, उपलब्ध पुरावे, सुसाईड नोट आणि इतर माहितीच्या आधारे तपास सुरू असून उपनिरीक्षक नितीन नरळे पुढील तपास करत आहेत.

    ** //या घटनेच्या दिवशी नीरज कोचर बोईसरमध्ये होते का, असल्यास त्यांची व जाधव यांची भेट झाली होती का, झाली असल्यास, या भेटीत काय घडले, भेटीच्या वेळी कोण उपस्थित होते?”कोचर बोईसरला त्या दिवशी असतील तर ते केव्हा परत निघाले, त्यांना ही घटना केव्हा समजली, त्यांनतर त्यांची प्रतिक्रिया तथा कृती काय राहिली? मुंबईच्या प्रवासाकडे असलेले कोचर माघारी फिरल्याचे सांगितले जाते, हे कितपत खरे आहे?”चौकशी यंत्रणा या सर्व बाजूंनी तपास करणार आहे का ? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल.//**

Leave Your Comments