****गोरठण,जव्हार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ₹२२.९४ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त****

Date: 2026-07-11
news-banner
नवयुग पालघर

****गोरठण,जव्हार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ₹२२.९४ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त****
**दादरा-नगर हवेली व दमण-दीव येथून महाराष्ट्रात अवैध वाहतूक; एका आरोपीला अटक**

               दादरा-नगर हवेली व दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतून महाराष्ट्रात विक्रीसाठी अवैधरित्या आणण्यात येणाऱ्या विदेशी मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत जव्हार तालुक्यातील गोरठण गावाजवळ सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनासह मोठा विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ₹२२.९४ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
              निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक पालघर व राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग यांच्या संयुक्त पथकाने १० जुलै रोजी खबऱ्याच्या माहितीच्या आधारे गोरठण येथे सापळा रचला. संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-04-LE-6125) अडवून तपासणी केली असता वाहनात दादरा-नगर हवेली व दमण-दीव येथे विक्रीसाठी असलेला विदेशी मद्य व बिअरचा मोठा साठा आढळून आला.
              जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ११२०.३२ बल्क लिटर विदेशी मद्य, ४२० बल्क लिटर बिअर मिळून १५४०.३२ बल्क लि. मद्य तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन यांचा समावेश असून एकूण किंमत ₹२२.९४ लाख इतकी आहे. या प्रकरणी हरजीत दिलबाग सिंग (वय ४५), रा. बुलंदशहर, उत्तर प्रदेश यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये अरुणकुमार चव्हाण – निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक पालघर, सुनील देशमुख – निरीक्षक, ठाणे विभाग, विवेक जाधव – निरीक्षक, दुय्यम निरीक्षक- निवेश डांगे, रुपेश चव्हाण, अभिजित मानकर, जवान  विजय पिंगळे, विक्रम भोईर, ओम लबडे , स्वप्नील चौधरी,  प्रतीक गांगुर्डे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अभिजित मानकर करीत आहेत.

Leave Your Comments