नवयुग पालघर
**कुपोषित बालकांचे आरोग्य प्रशासनाची जबाबदारी; ‘सुपोषण साथी पालघर’ उपक्रमाला सुरुवात**
https://youtu.be/znP-ozM-Dd4?si=S6BWtGAJfnrSTm-R
पालघर, दि. १० सप्टेंबर २०२६ : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने ‘सुपोषण साथी पालघर’ अभियानात सहभागी होऊन कुपोषित बालकांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले. प्रशासन, अंगणवाडी यंत्रणा आणि समाज यांच्या समन्वयातून कुपोषणमुक्त पालघरच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुपोषणाविरोधातील लढ्याला अधिक परिणामकारक स्वरूप देण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘सुपोषण साथी पालघर’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ‘राष्ट्रीय पोषण माह २०२६’ निमित्त केंद्रीय संचार ब्युरो, पुणे आणि जिल्हा परिषद, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेत दोन दिवसीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर २०२६ ते १५ मार्च २०२७ या कालावधीत जिल्ह्यातील ६५ SAM (गंभीर तीव्र कुपोषित) बालकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत दत्तक घेण्यात येणार आहे. या बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी विशेष आरोग्य व पोषणविषयक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील ७३४ MAM (मध्यम तीव्र कुपोषित) बालकांवर तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
दत्तक घेतलेल्या प्रत्येक बालकासाठी स्वतंत्र आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार असून, त्याच्या आरोग्य व पोषणस्थितीचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. संबंधित अधिकारी-कर्मचारी बालकांच्या घरी नियमित भेटी देऊन लसीकरण, आरोग्य तपासणी, वजन व वाढीचे परीक्षण, पोषक आहार आणि औषधोपचाराची आवश्यकता याबाबत देखरेख ठेवतील.
कुपोषणाची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यक बालकांना VCDC/NRC मध्ये दाखल करण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. तसेच प्रथिनेयुक्त अतिरिक्त आहार उपलब्ध करून देणे, अंगणवाडी केंद्रांतील आवश्यक सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, पूरक पोषण आहार आणि कुटुंबाचे समुपदेशन यावरही भर देण्यात येणार आहे. केवळ बालकाच्या वजनात वाढ करण्याऐवजी त्याच्या सर्वांगीण आरोग्य व विकासासाठी प्रयत्न करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी माता-बाल आरोग्य आणि पोषणाला विकासाच्या अजेंड्यात केंद्रस्थानी ठेवण्याची गरज व्यक्त केली. गर्भवती महिला आणि बालकांच्या आहाराबाबत जनजागृती करताना कमी वजनासोबतच अधिक वजनाच्या समस्येकडेही गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. त्यांनी पोषणविषयक विविध स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला.
राष्ट्रीय पोषण माहानिमित्त जिल्हा परिषदेत दोन दिवसीय पोषण चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. संतुलित आहार, कुपोषण निर्मूलन, माता-बाल आरोग्य, बालकांचा सर्वांगीण विकास आणि पोषणविषयक विविध बाबींवर या प्रदर्शनातून जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ पोषणविषयक माहिती देणारे बॅनर, नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी सेल्फी स्टॅण्ड तसेच स्वाक्षरी फलक उभारण्यात आला आहे.
चित्रप्रदर्शनाच्या आयोजनासाठी केंद्रीय संचार ब्युरोच्या क्षेत्रीय प्रचार अधिकारी शिल्पा नीलकंठ पोफळे, क्षेत्रीय प्रचार सहायक विकास तापकीर, कार्यालय सहायक वंदना थिगळे आणि मल्टी टास्किंग स्टाफ दीपक कोकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग इजाज अहमद शरीकमसलत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वैदही माळवी, बालविकास प्रकल्प अधिकारी पालघर अमोल पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी मनोर बापुराव नाळे, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि लाभार्थी उपस्थित होते.
#सुपोषणसाथीपालघर #पालघर #कुपोषणमुक्तपालघर #राष्ट्रीयपोषणमाह #पोषणमाह2026 #माताबालआरोग्य #बालपोषण #अंगणवाडी #पालघरजिल्हा #NavyugPalghar
navyugpalghar.com
Instagram | Facebook | X | YouTube — Navyug Palghar