“संविधानाने महिलांना दिलेले अधिकार जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” प्रा. सुप्रिया पाटील

Date: 2026-02-27
news-banner
नवयुग पालघर, विशेष :
“संविधानाने महिलांना दिलेले अधिकार जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” प्रा. सुप्रिया पाटील 

“संविधानाने महिलांना समानता, न्याय आणि सशक्तीकरणाचे भक्कम आधार दिले आहेत; हे अधिकार जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथील महिला विकास कक्षाच्या वतीने आयोजित “महिलांचे संविधानिक हक्क आणि कर्तव्ये” या विषयावरील सेमिनार उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता म्हणून प्रा. सुप्रिया पाटील उपस्थित होत्या.

आपल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानात प्रा. पाटील यांनी भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचा सविस्तर ऊहापोह केला. समानतेचा अधिकार, कायद्यापुढे समान वागणूक, भेदभावाविरुद्ध संरक्षण तसेच न्याय आणि सशक्तीकरणाच्या संधी या बाबी संविधानाने स्पष्टपणे अधोरेखित केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मार्गदर्शक तत्त्वांमध्येही स्त्री-पुरुष समानतेवर विशेष भर देण्यात आल्याचे नमूद करत, महिलांनी आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहणे आणि समाजाने ते जपण्यासाठी कटिबद्ध असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. तानाजी पोळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनघा पाध्ये देशमुख यांनी केले .
या सेमिनारला महिला विकास कक्षाच्या तसेच व्यवस्थापनाच्या सदस्या अमिता राऊत व प्रा. विवेक कुडू उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालयीन कर्मचारी व प्रा. संगीता मोरे यांचे सहकार्य लाभले. डॉ. शीला गोडबोले पाईकराव यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Leave Your Comments