**करंदीकर कुटुंबीयांच्या सहकार्याने विधी महाविद्यालयाच्या नव्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन उत्साहात**

Date: 2026-03-10
news-banner
नवयुग पालघर 

**करंदीकर कुटुंबीयांच्या सहकार्याने विधी महाविद्यालयाच्या नव्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन उत्साहात**
          सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी संचलित ‘आत्माराम जनार्दन करंदीकर विधी महाविद्यालय’ तसेच वासुदेव आत्माराम करंदीकर पदव्युत्तर अध्ययन केंद्र या  नव्या विस्तारित इमारतीच्या उभारणीचा शुभारंभ रविवारी (दि. ८ मार्च २०२६) भूमिपूजन सोहळ्याने उत्साहात झाला.

देणगीदार करंदीकर कुटुंबीयांतील ॲड. प्रकाश वासुदेव करंदीकर, अजित वासुदेव करंदीकर, शुभांगी प्रकाश करंदीकर, शिशिर अजित करंदीकर आणि पूजा करंदीकर यांच्या हस्ते  भूमिपूजन पार पडले . या कार्यक्रमास करंदीकर कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी नव्या विस्तारित इमारतीच्या उभारणीसाठी करंदीकर कुटुंबीयांनी दिलेल्या उदार आर्थिक सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. विधी शिक्षणाच्या क्षेत्रात करंदीकर कुटुंबीयांचे हे योगदान प्रेरणादायी असून त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विधी शिक्षणाला नवी दिशा आणि बळ मिळेल तसेच अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी मिळेल.
करंदीकर कुटुंबीयांच्या वतीने बोलताना ॲड. प्रकाश करंदीकर यांनी सांगितले की, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी ही संस्था अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. समाजातील सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना पालघर परिसरातच दर्जेदार शिक्षण मिळावे आणि विशेषतः विधी शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नव्या विस्तारित इमारतीच्या उभारणीसाठी आर्थिक सहकार्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या भूमिपूजन सोहळ्यास संस्थेचे विश्वस्त सोहनलाल बाफना, उपाध्यक्ष धनेश वर्तक, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी व अनिल पाटील, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश संखे, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या पायल चोलेरा यांच्यासह अतुल दांडेकर, चंद्रकांत तिवारी, सुरेश जोशी, अमिता राऊत, हेमाली राऊत, हितेंद्र शहा, सुधीर दांडेकर, भरत राऊत, योगेश म्हात्रे, दिनेश पाटील, रामप्रकाश निराला तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटील उपस्थित होते.

याशिवाय परिसरातील ज्येष्ठ वकील ॲड. दीपक सावळे व ॲड. सुधीर गुप्ता, अनेक समाजसेवक तसेच मान्यवर नागरिकही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave Your Comments