बोईसर मतदारसंघ : बंडखोरी टाळल्याने तरेंचा विजय

Date: 2024-12-02
news-banner

बोईसर मतदारसंघ : बंडखोरी टाळल्याने तरेंचा विजय
महायुती शिवसेना शिंदे पक्ष,महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे पक्ष व बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत असलेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघात महायुती प्रणित शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार विलास तरे यांनी ४४ हजार ४५५ इतके मताधिक्य मिळवत २०१९मधील पराभवाची भरपाई केली. अर्थात तयावेळी एकत्रित शिवसेनेतून उभे राहूनही तरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.यावेळी युतीने बंडखोरी होणार नाही याची खबरदारी घेतली. तरे यांना ०१ लाख २६ हजार ११७ (४५.३४ टक्के) मते मिळाली. तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार पाटील यांना 
 पराभवाला सामोरे जावे लागले.त्यांना ८१ हजार ६६२ (२९.३६टक्के) इतकी मते मिळाली.शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ.विश्वास वळवी तिसर्‍या नंबरवर राहिले.वळवी याना ५० हजार ५७१ (१८.१८ टक्के) इतकी मते मिळाली.जिजाऊचे नरेश धोडी यांनी ६ हजार १४४(२.२१ टक्के) इतकी मते घेतली तर नोटाला येथे ०३ हजार ६१३( १.३०टक्के) इतक्या मतदारांनी पसंती दिली.
         लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुती शिंदे पक्षाचे विलास तरे यांच्या मताचा टक्का ०३.३१ टक्क्यांनी वाढला असून २०१९ विधानसभेच्या तुलनेत (एकत्रित शिवसेना) देखील १.६६ टक्के  इतका वाढला आहे. याउलट २०१९ च्या तुलनेत बहुजन विकास आघाडीच्या मताचा टक्का ०७.६२ टक्क्यांनी घटला आहे. मात्र लोकसभेच्या तुलनेत ०३.०९ ने वाढला आहे. लोकसभेच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या मतात ०७.१५ तर २०१९ विधानसभेच्या तुलनेत (एकत्रित शिवसेना) १७.५० टक्क्यांनी घटल्याचे दिसते. या मतदारसंघातील मतमोजणीच्या एकूण २९ फेर्‍यांपैकी तरे यांना २२ फेर्‍यांमध्ये मताधिक्य मिळाले असून पाटील यांना केवळ ०७ फर्‍यांमध्येच मताधिक्य मिळाले आहे.तर वळवी हे सर्व फेर्‍यांमध्ये पिछाडीवर राहिले.

Leave Your Comments