डहाणू मतदारसंघ : भगव्या वादळात लालबावटा फडकला
अखेरपर्यंत दोन्ही प्रतिस्पर्ध्याच्या उत्कंठा शिगेला पोचवणार्या डहाणू विधानसभा मतदारसंघात अखेरीस महाविकास आघाडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विद्यमान आमदार विनोद निकोले यांनी बाजी मारली.त्यांनी भाजपच्या विनोद मेढा यांचा ५१३३ मतांनी पराभव केला.निकोले यांना ०१ लाख ०४ हजार ७०२ (४७.२१टक्के) तर मेढा यांना ९९ हजार ५६९(४४.९ टक्के) इतकी मते मिळाली.लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत निकोले(अर्थातच महाविकास आघाडी) यांनी आपला मताचा टक्का ०७.०८ टक्क्यांनी वाढवला आहे तर मेढा यांच्या मतांचा टक्का देखील ०५.१९नी वाढला आहे. २०१९ विधानसभेच्या तुलनेत देखील निकोले यांच्या मतांच्या टफ्क्यांमध्ये ०३.७७ टक्क्यांनी वाढ झाली असून मेढा यांच्या मतांच्या टक्याची २०१९ च्या तुलनेत ०४.३०टक्क्यांनी वाढ झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत निकोले याच्या मतातील वाढ बहुजन विकास आघाडीने ऐनवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे झाल्याचे म्हणता येईल.अर्थात शिवसेना ठाकरे,काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबरोबरीने कष्टकारी संघटना आदी सहभागींचाही यात मोठा वाटा आहे.निकोले,हे दुसर्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.ह्यातील सहापैकी पाच मतदारसंघात महायुतीने आपला झेंडा फडकवला असताना,निकले यांनी आपला लाल बावटा फडकवत ठेवल्याने त्यांच्या विजयाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होत आहे.या मतदारसंघात मतमोजणीच्या २४ फेर्या पार पडल्या.यात १५ फेर्यांमध्ये निकोले आघाडीवर राहिले तर नऊ फेर्यांमध्ये मेढा हे आघाडीवर राहीले.