मुंबई समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र ह्या मार्गावरील हजारो ग्रामस्थांना, कोणताही पर्याय न देता, त्यांची प्रचंड गैरसोय करून हे होत आहे, यावर भाष्य करणारे,
नवयुग पालघरचे १३ एप्रिलचे संपादकीय :
पर्यायी मार्ग न देता, रेल्वे फाटक बंद करणे अन्यायकारक
दिल्ली - मुंबई समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे रेल्वे प्रशासनामार्फत सांगितले जात आहे. यासाठी या मार्गावर अस्तित्वात असलेली मानव संचालित रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर सफाळा आणि नवली येथील रेल्वे फाटक बंदही करण्यात आले आहेत. मात्र असे करताना, या फाटकाचा वापर करून रेल्वे प्रवासी किंवा परिसरातील स्थानिक ग्रामस्थ ये-जा करत होते, त्यांचे काय ? या प्रश्नाचे उत्तर न देताच हे फाटक बंद करण्यात आलेले आहेत. या फाटकाच्या जागी उड्डाणपूल बनवले आहेत, असे सांगून रेल्वे प्रशासन आपली सुटका करून घेत आहे. मात्र फाटकाला उड्डाणपूल हा काही पर्याय होऊ शकत नाही हे रेल्वे प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने विचारात घेतले नाही असे स्पष्टपणे दिसून येते. उड्डाणपूल हा वाहनांसाठी असतो इतके साधे वास्तवही प्रशासनाच्या लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते.
नवयुग पालघच्या या अंकात आम्ही या मार्गावरील फाटक बंद केल्याने प्रवाशाचे कसे हाल होत आहेत किंवा होणार आहेत हे वास्तव समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सफाळे येथे रेल्वे उड्डाणपूल बनवण्यात आला. मात्र त्याची जागा निवडताना कशी मनमानी झाली आहे हेही आम्ही निदर्शनास आणून दिले आहे. उड्डाणपूलाने प्रश्न मिटणार नाही हे लक्षात आल्यानंतर खासदारांसमवेत बैठकही झाली. या बैठकीत सफाळे रेल्वे फाटकाला पर्याय म्हणून पादचारी पूल निर्माण करण्याचा निर्णय झाला. हे दोन पादाचारी पूल बनण्या अगोदरच सफाळे येथील फाटक बंद करण्यात आले. अशा स्थितीत आता सामान्य प्रवासी आणि ग्रामस्थ ये - जा कशी करणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवली येथेही असेच घडले आहे. हे असे का व्हावे ?
दिल्ली - मुंबई समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग प्रस्तावित असताना या प्रकल्पांतर्गत, या प्रकल्पामुळे कोण कोण बाधित होणार आहेत याचा अभ्यास प्रकल्पधारकांनी करणे अपेक्षित असते. साहजिकच रेल्वे फाटक बंद झाल्यास कोणते परिणाम संभवतात ? या रेल्वे फाटकाचा वापर किती जण कोणत्या प्रकारचे प्रवासी करतात ? आणि हे प्रवासी कुठून कुठे जातात ? ही सर्व माहिती रेल्वे प्रशासनाने प्राधिकरणाने गोळा करणे अपेक्षित असते. या प्रकल्पांतर्गत अशी पाहणी केली गेली होती का आणि केली गेली असल्यास केवळ उड्डाणपूलावर प्रशासन का थांबले हा प्रश्न उपस्थित होतो.
प्राधिकरणाने काही ठिकाणी भुयारी मार्गाचा अवलंब केला आहे. मात्र हे भुयारी मार्ग कुचकामी ठरले आहेत. देशभरात रस्ते, रेल्वे प्रकल्प उभे करताना अगदी बुलेट ट्रेनचा प्रकल्पांतर्गत देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यापेक्षाही अवघड भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. असे असेल तर रेल्वे मार्गावरील हे भुयारी मार्ग कुचकामी का ठरले ? येथे पावसाळ्यात पाणी साचत असेल तर या मार्गाच्या बांधकामात खरा दोषी कोण ? आणि हे दोष दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काय केले ? याचे उत्तर मिळायला हवे. हे उत्तर मिळेल तेव्हा मिळेल. मात्र पावसाळ्यात जर हे भुयारी मार्ग बंद होणार असतील. तर हे मार्ग बंद ठेवून त्या भागातील हजारो ग्रामस्थांची गैरसोय करून रेल्वे मालवाहतूक मार्ग सुरू होणार असेल तर ते अन्यायकारकच आहे असे म्हणावे लागेल.
अगदी दादर - मुंबई सारख्या ठिकाणी देखील उड्डाण पुलाबरोबरीने पादचारी पूल उभे असल्याचे आपण पाहत आहोत. अशा स्थितीत नवली उड्डाणपूलाला लागून पादचारी पुल का बनवला गेला नाही हा प्रश्न उपस्थित होतो. सफाळे बाबतीत देखील असेच म्हणता येईल.
सफाळे आणि केळवा रोड रेल्वे स्थानकात तर प्रवाशांना रेल्वे स्थानकावर येण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. सामान घेऊन किंवा शेतमाल, दूध घेऊन प्रवाशांना रेल्वे स्थानकात पोहोचणे किंवा बाहेर पडणे यामुळे खूपच त्रासदायक बनले आहे. असे पूल बनवताना दिव्यांगाचा विचार होणे अपेक्षित आहे. मात्र त्याचबरोबर अन्य प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडेही संबंधितांचे लक्ष असायला हवे. येथे मात्र तसे झाल्याचे दिसत नाही आणि आता तर सफाळे, केळवा रोड, रोठे, नवली, बोर्डी अशा ठिकाणी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता दररोज हजारो प्रवाशांची/ग्रामस्थांची गैरसोय करून रेल्वे फाटक बंद करण्यात आलेले आहेत.
एका बाजूने विकास प्रकल्पांसाठी स्थानिक जनतेची साथ मागायची आणि दुसर्या बाजूने या विकास प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या होणार्या गैरसोईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे हा प्रकार संतापजनकच म्हणता येईल.येथे जाणीवपूर्वक असे अगदी जाणीवपूर्वकच म्हटले आहे. याचे कारण स्थानिक प्रकल्प अधिकार्याचा दृष्टीकोन. आणि यासाठी दिल्ली मुंबई समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्गाचे स्थानिक अधिकारी आणि स्थानिक जिल्हा प्रशासन यांना जबाबदार धरावे लागेल.ह्या अधिकार्यांनी या महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केले.प्रवासी संघटनांच्या पदाधिकार्यांनी ह्या बाबी नजरेस आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
आमचे यापूर्वीचे खासदार राजेंद्र गावित आणि आमदार तसेच इथले स्थानिक पदाधिकारी यांचेही याकडे लक्ष जाऊ नये हेही आश्चर्यजनकच आहे.रेल्वे स्थानक,तसेच मंडळ तसेच विभागीय पातळीवरील समिती सदस्यांनाही यासाठी जबाबदार धरावे लागेल !