नवयुग पालघर : संपादकीय २७ एप्रिल पहलगम येथील हल्ल्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. एकप्रकारे पर्यटनालाच या हल्ल्याच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे, यासंबंधातील नवयुग पालघरचे हे संपादकीय : पहलगाम येथील हल्ल्यानंतर

Date: 2025-08-05
news-banner
नवयुग पालघर : संपादकीय २७ एप्रिल

पहलगम येथील हल्ल्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. एकप्रकारे पर्यटनालाच या हल्ल्याच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे, यासंबंधातील नवयुग पालघरचे हे संपादकीय :

पहलगाम येथील 
हल्ल्यानंतर .......... 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले. या पर्यटकांमध्ये दोन परदेशी पर्यटक असून महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. या भ्याड हल्ल्याचा नवयुग पालघर तीव्र शब्दात निषेध करत आहे. 
गेल्या सहा वर्षातील काश्मीर मधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून आजवरील दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यापेक्षा वेगळा, पर्यटकांना प्रथमच लक्ष्य करणारा असा हा हल्ला आहे. काश्मीरशी संबंधित ३७० कलम हटविल्यानंतर नंदनवन म्हणून ओळख असलेल्या काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढल्याचे सांगितले जात असतानाच पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन या गवताळ पठारावर अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर ए तोयबाचे हस्तक असलेल्या द रेसिडेंट फ्रंट या संघटनेने आपण हा हल्ला केल्याचे सांगितले आहे. या हल्ल्याचा देशातील सर्व भागातून निषेध व्यक्त होत  असून जगभरातूनही ह्या हल्ल्याविरोधात प्रतिक्रिया येत आहेत. देशभरातील मुस्लिम समुदायाकडूनही ह्या हल्ल्याचा उघडपणे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. विशेषत: काश्मीरमधून या हल्ल्याविरोधातील मुस्लिम  समुदायाच्या  प्रतिक्रिया तिथल्या लोक मानसाचे दर्शन घडवणार्‍या आहेत. दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाने हत्या केल्याची माहिती समोर येत असतानाच  हल्ल्याच्यावेळी मुस्लिमांनी अनेकांना मदत केल्याची माहितीही समोर येत आहेत. यातील एका मुस्लिम घोडेस्वाराला दहशतवाद्यांनी तो पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून जागीच ठार केल्याचे वृत्तही समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पर्यटकांसाठी हा भाग खुला केला असताना तेथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती अशी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे. पालघरसह  जिल्ह्यातील मुस्लिम समुदायांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून अतिरेक्यांना धडा शिकवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे विविध ठिकाणच्या मशिदीतून अतिरेक्यांच्या निषेधाचा rही मोहीम उघडपणे चालवण्यात आली. 
अतिरेक्यांविरुद्धची ही लढाई  भारतीयांनी एकत्रितपणे लढायची आहे. अशावेळी धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रयत्न थांबायला हवेत. एकेकाळी काश्मीरमध्ये दहशतवादाला समर्थन मिळत होते. मात्र आता त्यांच्या मनस्थितीत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या हल्ल्यानंतर गावागावातून सर्व भागातून झालेला निषेध हे त्याचे उदाहरण म्हणून सांगता येईल. या हल्ल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी काश्मीरमधील जनतेने आपल्या भावनेचे आगळे वेगळे  दर्शन घडवल्याची माहिती आता पुढे येत आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटनावरच अवलंबून असल्याचे हेरुनच दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे. अशा स्थितीत दहशतवाद्यांना जिंकू द्यायचे नसेल तर तिथला पर्यटन व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरू राहील यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी याही परिस्थितीत काश्मीरला दिलेली भेट हे याचे चांगले उदाहरण ठरू शकेल.
फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ यांच्या आई, अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशनच्या विश्वस्त, जीत एरोस्पेस इंन्स्टिट्यूटच्या फॉर्मर डायरेक्टर - कविता गाडगीळ यांचं आवाहनही या परिस्थितीत मोलाचे ठरणार आहे. त्या म्हणतात, २००१ मध्ये सप्टेंबरच्या त्या रात्री अभिजितने त्याच्या ‘मिग -२१’ मधून टेकऑफ केलं. त्यानंतर अवघ्या ३३ सेकंदांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. अभिजितचं ‘मिग-२१’ क्रॅश झालं. काही म्हणजे काही हाती लागलं नाही. फक्त रिकामं भकास आकाश आणि जीवघेणी शांतता तेवढी मागे राहिली... त्या तसल्या जीवघेण्या शांततेचं ओझं अनेक वर्षं मनावर आहे, म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांशी बोलायचं ठरवलंय. परवा पहलगाममध्ये जे झालं त्यानंतर देशात उफाळून आलेला संताप मला दिसतो आहे. मला तो कळतोही आहे.पण म्हणूनच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, आपल्या तरुण तडफदार मुलांना वृथा अभिमान आणि सूडाच्या तोंडी देण्यापूर्वी थांबा आणि सारासार विचार करा. आपल्यावर झालेल्या अन्यायाला पोटात घ्या असं मी अजिबात म्हणत नाही. पहलगामचा बदला घ्यायला हवाच. 
या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळायलाच हवा. आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा. संरक्षण अधिक काटेकोर हवं. 
बंधूभगिनींनो, तुम्ही म्हणताय तसं, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना काही मूठभर स्थानिक काश्मिरींकडून मदत मिळते, आसरा दिला जातो, हे खरंच. पण काश्मीरकडे पाठ फिरवणं हा त्यावरचा उपाय नाही. उलट हीच वेळ आहे त्या मूठभर काश्मिरींकडे दुर्लक्ष करुन मोठ्या संख्येने शांतता हवी असलेल्या काश्मिरींसाठी आपला हात पुढे करण्याची.दहशतवाद हा तिरस्काराला खतपाणी घालतो.काश्मीरच्या ट्रिप्स कॅन्सल करुन, तिथल्या व्यवसायांवर बहिष्कार घालून किंवा तिथल्या लोकांकडे पाठ फिरवून तुम्ही दहशतवाद्यांना अद्दल घडवत नसता तर त्यांना बळ देत असता हे लक्षात असुदे !
अर्थातच, काश्मिरी पंडितांना खोर्‍यात परत आणायला हवं. त्यांना न्याय मिळायला हवा.भूतकाळातल्या चुका सुधारायला हव्यात. १९४७ ला घुसखोरी झाली तेव्हा, नंतर कारगिल घडलं तेव्हाही काश्मिरी मेंढपाळ, गुज्जर, बकरवालांनीच त्याबद्दल सैन्यदलांना पहिली माहिती देत सावध केलं होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का? अगदी परवा पहलगाम झालं तेव्हाही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत न जाऊ देणारे, त्यांना खाऊपिऊ घालणारे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव देणारे तेच स्थानिक काश्मिरी होते हे आपण विसरुन चालणार नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. 
काश्मीरला जा. तिथल्या लोकांच्यात मिसळा. त्यांची हॉटेल्स, बागा, बाजार हे तुमच्या अस्तित्वाने भरुन टाका. त्यांची सफरचंद, त्यांचे जर्दाळू,केशर, गालिचे, शाली विकत घ्या. तिथे व्यवसाय सुरु करा. दुकानं उघडा. तिथे रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येऊदेत. धरणं,पूल उभे राहुदेत. त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या! काश्मीरच्या गोष्टीचा उत्तरार्ध तिरस्काराने नाही तर प्रेमाने लिहिला जाऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याची ही वेळ आहे. हे घडलं तर पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरलाही फरक दिसेल, जाणवेल आणि तिथले लोक स्वत:च पाकिस्तानचं वर्चस्व नाकारतील !
काश्मिरी लोकांनी आम्हाला वाचवलं, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत हे पहलगाममधला दहशतवादी हल्ला अनुभवलेले पर्यटक आपल्याला जीव तोडून सांगतायेत.. सर्वसामान्य काश्मिरी माणूस कष्टाळू आहे.त्यांनाही वाटतं आपल्या मुलाबाळांनी शिकूनसवरुन, सर्वसामान्य भारतीयांसारखं शांत स्थिर आयुष्य जगावं... पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला नृशंस हिंसाचार पाहिलेली, अनुभवलेली, त्यातून स्वत:चं सर्वस्व गमावलेली माणसं मानवतेवर विश्वास ठेवू शकतात तर आपणही तो ठेवायला हवा.फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ यांच्यार् आइंचा हा संदेश आपण सर्वांपर्यंत पोचवूयात!

Leave Your Comments