जिल्हा रुग्णालय आणि मनोर येथील ट्रॉमा रुग्णालय हे जिल्ह्याच्या प्राधान्यक्रमात असायला हवे, नव्हे प्रामुख्याने आरोग्य व्यवस्था हे जिल्हा निर्मिती मागचे एक कारण राहिले आहे. मात्र निधीअभावी हेच प्रकल्प रखडलेले आहेत. यावर भाष्य करणारे हे संपादकीय...
नवयुग पालघर संपादकीय : ०४ मे
जिल्हा व मनोर रुग्णालय पालकमंत्र्यांच्या प्राधान्यक्रमात येऊद्या !
अलीकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्ह्याला अनेकदा भेटी दिल्या. पालघर जिल्ह्याकडे माझे लक्ष राहणार आहे याची प्रचिती अलीकडील त्यांच्या या दौर्यांनी आणून दिली. आपल्या दौर्यात वाढवण प्रकल्प, माहीम येथील प्रस्तावित वस्रोद्योग प्रकल्प, विमानतळ, चौथी मुंबई अशा अनेक बाबींचा या आपल्या दौर्यात ते सातत्याने उल्लेख करत असतात. पालघरचा विकास हा आपला ध्यास असल्याचेही ते आवर्जून सांगतात. असे असले तरी पालघर जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांकडे त्यांनी पुरेसे लक्ष द्यायला हवे असे त्यांना आमचे आग्रहाचे सांगणे आहे.
जिल्हा रुग्णालय व मनोर येथील २०० खाटांचे रुग्णालय, जव्हार येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालय, नांदगाव तर्फ मनोर येथील वारली हाट अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा यामध्ये उल्लेख करावा लागेल. मध्यंतरी आरोग्यमंत्र्यांनी पालघरचा दौरा करून जिल्हा रुग्णालयासह मनोर येथील २०० खाटांचे रुग्णालय तसेच अन्य आरोग्य संस्थांना भेटी दिल्या. या भेटीत आरोग्यमंत्र्यांनी विशेषत: जिल्हा रुग्णालय व मनोर येथील २०० खाटांच्या रुग्णालयासाठी प्रलंबित निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक घोषणा केल्याचे दिसले नाही. पालघर जिल्हा रुग्णालय तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही सूचना केल्या. मात्र या दौर्यानंतर पुढे काय हा प्रश्न राहिलाच.आरोग्यमंत्र्यांची ही सूचना खरोखरीने प्रत्यक्षात येणार आहे का ?असल्यास, आरोग्यमंत्र्यांनी यादृष्टीने कोणती पावले उचलली आहेत, हे जिल्हावासियांसमोत यायला हवे.
पालकमंत्र्यांनी आता ह्या जिल्हावासियाच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. जिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करायचे असेल तर त्या दृष्टीने तात्काळ निधी उपलब्ध करून नियोजन करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा रुग्णालय हा जिल्हावासियांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. जिल्हा निर्माण होऊन दहा वर्ष होऊनही जिल्हा रुग्णालय उभे राहू नये हे खेदजनकच आहे. म्हणूनच आता निधी उपलब्ध कसा होईल यादृष्टीने पालकमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे.
मनोर येथील २०० खाटांचे रुग्णालय देखील असेच निधी अभावी रखडत चालले आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने या दोन्ही रुग्णालयाचे महत्त्व खूप आहे. जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न देखील असाच प्रलंबित राहिलेला आहे. ह्या रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने पालकमंत्र्यांनी आता विशेष लक्ष द्यायला हवे. मनोर जवळील नांदगाव तर्फे मनोर येथील वारली प्रकल्पाकडे तर सर्वांचेच दुर्लक्ष झालेले दिसते. पालकमंत्र्यांनी आता यातही लक्ष घालायला हवे.
जिल्ह्यातील या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी आता निधीचा अडथळा येणार नाही या दृष्टीने पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्न करायला हवे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या दोन्ही जनता दरबारात यासंबंधीचे प्रश्न उपस्थित झाले. यावेळी या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प फारसे पुढे सरकत असल्याचे दिसत नाही. जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या अशा या प्रकल्पांची ही धीमी गती निश्चितच चिंताजनक आहे. म्हणूनच पालकमंत्र्यांकडून ठोस पावले उचलली जायला हवी अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर किमान जिल्हा रुग्णालय व मनोर येथील रुग्णालय तरी पालकमंत्र्यांच्या प्राधान्यक्रमात यायला हवी.