अमृत अधिकारी : विचारधारा जपणारं आणि मूल्याची कास धरणारं व्यक्तिमत्त्व

Date: 2025-08-05
news-banner

जिल्ह्यातील एक नावाजलेला वकील, मूल्याची कास धरणारे व्यक्तिमत्त्व अमृत अधिकारी यांचे अकस्मात जाणे, कुटुंबिय, नातेवाईक व मित्र साऱ्यांसाठीच धक्कादायक होते, या पार्श्वभूमीवरील हे 11 मे रोजीचे संपादकीय :

अमृत अधिकारी : विचारधारा जपणारं आणि मूल्याची कास धरणारं व्यक्तिमत्त्व

१८ एप्रिल ते २९ एप्रिल, केवळ ११ दिवस...१८ तारखेला आपण सोबत प्रवास केला. त्यानंतर २९ तारखेला तू एकटाच दूरच्या प्रवासाला निघून गेलास.

तू तर आरोग्याविषयी प्रचंड सजग. कोणत्या व्याधीवर काय उपचार याची माहिती तुझ्याकडे असायची आणि तू ती असा कोणी भेटला की त्यांच्यापर्यंत पोचवायचास.. आपल्या सहकाऱ्यांपैकी कोणी आजारी असला की तू त्याच्या घरी पोचत असे आणि त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यापर्यंत साथ करत असे... आपल्या आदिवासी सहकाऱ्यांना तू दिलेली साथ माझ्या आजही आठवणीत आहे. परवा सोबतच्या प्रवासात आपलं बोलणंही झालं यावर... किराट येथील कातकऱ्यांवरील पोलीस अत्याचाराच्या कहाण्या ऐकल्यानंतर भुस्कुटे भाऊ, उल्का, सुरेखा ताई सोबत तू दिवसभर होतास... उशीर झाल्यानंतर तू तुझ्या पालघरच्या घरी सर्वांना घेऊन आलास, अत्याचाराच्या घटनेचा अहवाल तयार होत असताना त्यात सहभागी होत तू स्वतः सर्वांसाठी जेवण बनवून खायला घातलंस..

तुझ्या सामाजिक बांधीलकीची अनेक उदाहरणे आहेत. कित्येक घटनांमधून आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे... सोनावे दारशेतचा सदूदा, धुकटनचा रामादा अशी एक ना अनेक नावं सांगता येतील.. तुझं सामाजिक राजकीय नातं थेट कुटुंबापर्यंत, त्या माणसाच्या सुख दुःखापर्यंत पोचायचं, हे मी खूप जवळून पाहिलंय आणि अशावेळी तुझा हात खिशात पोचून त्यांच्या हातात देखील अलगद जायचा.. तू दिलदार तर होतास पण पैसा हा तुझ्यासाठी कधी गर्व नाही बनला.... तू अतिशय खडतर परिस्थितीतून पुढे आलास... नवनीतभाईची साथ करणारे तुझे वडील... भाईसोबत मी अनेकदा त्या जुन्या घरात गेलोय, पुढे तुझा संपर्क आल्यानंतर तुझ्यासोबत देखील... साहजिकच तुझा प्रवास पाहिलाय तसा ऐकलाही आहे... ह्या साऱ्या परिस्थितीवर मात करतानाचा तुझा प्रवासही मी पाहिला आहे.. हा सारा प्रवास आम्हा साऱ्यांना अभिमान वाटावा असाच होता...
तू कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास स्वतः निवडलेल्या या क्षेत्रात तू स्वतःला झोकून दिलस तुझ्या क्षेत्रातील काहींसाठी हे अभ्यास करून यश संपादन करण्याचं क्षेत्र राहिलं नसेलही क्षेत्र राहिलं नसेलही, किंबहुना काहीसं तस चित्रही अनुभवास येतही.. पण तुझ्यासाठी त्ते तसं मूळीच नव्हतं... तू वकील बनल्यानंतर सुरुवातीच्या काळात ज्यांच्याकडे उमेदवारी केली त्या बाळ काकांकडून (वकील सुधाकर परुळेकर) आलेला हा वारसा असावा बहुदा., पण आपल्याकडे आलेल्या प्रत्येक अशिलाच प्रकरण समजून घ्यायचं, त्याला कायद्याचा कसा आधार घ्यायचा याचा विचार करायचा, त्याला आधार म्हणून जे काही असेल त्याचा शोध घ्यायचा आणि मग टायपिस्टच्या बाजूला बसून (तिलाही पुढे वकील म्हणून पुढे आणलं) किंवा आपल्या ज्युनिअरला घेऊन ते कागदावर उतरवायच. पुढे न्यायालयात आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा आधार घेत, बिनतोड युक्तिवाद करत तू अशिलाला न्याय मिळवून द्यायचा. तू फौजदारीमध्ये आपलं निर्विवाद स्थान निर्माण केलं, इथंही तू मूल्य सांभाळूनच आपलं कौशल्य सिद्ध केलंस..

आपल्या अनेक अशिलाना तू यश मिळवून दिलंस... पण साधू हत्या प्रकरणात अनेक काळ तुरुंगात असलेल्या आदिवासींना जामीन मिळवून देण्यात तू तुझं लावलेलं कसब, तुझ्या ह्या क्षेत्रातील तुझ्या कौशल्याची एकप्रकारे पावतीच म्हणावी लागेल... ह्या प्रकरणाची एकूण पार्श्वभूमी, त्यावेळचे वातावरण सारं विपरीत असताना तू ह्या साऱ्यांसाठी धैर्याने उभा राहिला, त्या वेळेचं तुझं धैर्य शब्दातीत आहे... पालघर ठाणे प्रवास करत, सरकारी वकिलांच्या म्हणण्यावर बिनतोड युक्तिवाद करत तू हे यश मिळवळस. उलटतपासणीचे अनेक किस्से तुझ्याकडून ऐकले आहेत मी... वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उलटतपासणी दरम्यान, तू वैद्यकीय अंगाने पूर्ण तयारीनिशी उतरायचा, पोलीस अधिकाऱ्यांच्या उलटतपासणी दरम्यान त्यांची कशी भंबेरी उडवायचा याचेही अनेक किस्से मी ऐकलेत. पुढे न्यायालयाच्या निकालासंबंधात किंवा असेच काही कायदेशीर मुद्दे समजून देण्यात तू अनेकदा केलेली मदत विसरणं अशक्य आहे.... आपण काम करत असलेल्या क्षेत्रात काही चुकीचं घडतंय असं दिसलं तर तू निर्भयपणे त्याविरोधात उभं राहिल्याचंही आम्ही पाहिलं आहे...

महेंद्रचं जाणं तुझ्यासाठी मोठा धक्का होता, हा धक्का घेऊनच तू जगत राहिलास, त्याचं जाणं तुला सतत अस्वस्थ करत राहिलं, याचाही अनुभव मी अनेकदा घेतला आहे... सामाजिक क्षेत्रातील त्याचं कर्तृत्व आणि राजकीय क्षेत्रातील त्याचं यश याचा तुला सार्थ अभिमान राहिला..

सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरत असताना तू कायमच मूल्याची कास धरलीस... लोकशाही समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता यावरील तुझा विश्वास तू कधीही ढळू दिला नाहीस.. अलीकडील राजकीय, सामाजिक वातावरण तुलाही अस्वस्थ करत असे. मणिपूरमधील घटने अनुषंगाने पालघर येथिल निषेध आंदोलनात तुझं हे अस्वस्थपण ठळकपणे दिसून आलं... परवा प्रसादनं सांगितलं... तू आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करायची म्हणून एक कात्रण टेबलच्या खणात काढून ठेवलं होतंस, प्रसाद न्यायालयीन कामानिमित्त मुंबईत जात असल्याचं समजल्यावर तु त्याला बोलवून घेतलंस आणि ती आर्थिक मदत तिथवर पोचवायंचं काम त्याच्यावर सोपवलंस... तुझा एक गरीब आदिवासी अशील तुला त्याच्या घरातल्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आला होता, लग्नपत्रिका संपल्याने त्याने झेरॉक्स केलेली पत्रिका तुला दिली. त्यानं तुला हे मोकळेपणानं सांगितलंही....तू खणात हात घालून त्याच्या हातात अगदी सहजपणे पैसे ठेवले... हे सारं कुठंतरी आतून असावं लागतं. आपल्या धावपळीच्या, व्यस्त, जीवनात तू जी बांधिलकी जपलीस ते खरोखरच तुझं वेगळेपण म्हणता येईल...

तुझ्या कुटुंबियांत तर तुझी माया ओतप्रोत भरलेली. पण तू मायेची किती माणसं आसपास गोळा केलीस, ते ह्या दिवसांत समजलं. तू प्रामाणिक आणि सचोटीने जीवन जगलास, आर्थिकदृष्ट्या देखील तू छान स्थिरावला होता तरीही तू साधेपणाने जगत राहिलास. तुझ्या मुलीमध्ये म्हणजेच कुटुंबियांमध्ये ते झिरपल्याचं रविवारी आदरांजली सभेदरम्यान पहायला मिळालं. आपल्या बाबांना घट्ट धरुन असलेली ऐश्वर्या, त्यांचा वारसाही तितक्याच घट्टपणे कुटुंबियांसह पुढे नेईल, ह्या तिने दिलेल्या विश्वासाने अनेकांना बळ दिलं.. तू सर्वत्र भरून राहिला आहेस, हे ती म्हणाली ते खरंच आहे ! ऐश्वर्याचा हा विश्वास तुझ्यापर्यंत पोचला असेलच!

Leave Your Comments