सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा सोहम घरत ठरला 'मिस्टर युनिव्हर्सिटी २०२४-२५'; श्रेया गायकवाडला 'मिस युनिव्हर्सिटी' स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक!
पालघर : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सोहम कल्पेश घरत याने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात 'मिस्टर युनिव्हर्सिटी २०२४-२५' हा मानाचा किताब पटकावून संपूर्ण महाविद्यालयाचा, संस्थेचा आणि विभागाचा गौरव उंचावला आहे. विशेष म्हणजे, 'मिस युनिव्हर्सिटी' या स्पर्धेतही महाविद्यालयाच्या कु. श्रेया गायकवाड हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे, हीही आनंददायी बाब ठरली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या वार्षिक युवा महोत्सवात विविध सांस्कृतिक कला, व्यक्तिमत्त्व आणि सादरीकरण आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास ३५० महाविद्यालयांमधून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला असताना, सोहम घरत याने 'जॅकपॉट इव्हेंट'मधून आपला ठसा उमटवत 'मिस्टर युनिव्हर्सिटी'चा प्रतिष्ठित किताब आपल्या नावावर केला. या पुरस्कारासाठी स्पर्धा अत्यंत कठीण आणि चुरशीची होती.
सोहम सध्या सोनोपंत दांडेकर कला, व्ही. एस. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर येथे शिक्षण घेत असताना विद्यार्थीदशेतील परिपक्वता, नेतृत्वगुण आणि प्रभावी संवादकौशल्य यामुळे त्याला हा सन्मान मिळाला.
सोहमच्या या यशाबद्दल महाविद्यालय परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून, प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी त्याचे विशेष कौतुक करत म्हटले की, “सोहमच्या यशामुळे महाविद्यालयाचा सन्मान दुप्पट झाला आहे. तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहे.” संस्थेचे अध्यक्ष सी. ए. सचिन कोरे, उपाध्यक्ष धनेश वर्तक, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी आणि इतर मान्यवरांनी देखील सोहम व श्रेयाचे अभिनंदन केले आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सोहमने ‘मिस्टर युनिव्हर्सिटी’ हा पुरस्कार स्वीकारला तो क्षण उपस्थितांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला.
या यशाने सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या उज्ज्वल परंपरेत नवा मानाचा अध्याय जोडला आहे.