राहुल गांधींच्या वोट चोरी, तक्रारीची घेतली दखल :
पालघर जिल्ह्यातील एकाच महिलेची सहा ओळखपत्रे :
पाच रद्द करून आता राहिले एकच नाव :
जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांनी केली कारवाई
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच, महाराष्ट्रातील पालघर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत नालासोपारा विधानसभा मतदारसंघात सुषमा गुप्ता यांचे नाव सहा ठिकाणी नोंद झाल्याचे निदर्शनास आणून देत खळबळ उडवून दिल्यानंतर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा तात्काळ जागी झाली असून, ह्या यंत्रणेने या महिला मतदाराची एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदलेली सर्व दुबार नावे वगळली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यासह निवडणूक कामांमध्ये कसूर करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
या संदर्भात दिलेल्या खुलाशात, १३२ नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता यांनी जानेवारी २०२४ च्या आसपास मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी नाव नोंदणीचा फॉर्म क्रमांक - ६ ऑनलाइन पद्धतीने दाखल केला. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्वरित कार्ड मिळेल असा त्यांचा समज होता. तथापि, हा अर्ज केल्यानंतर एपिक कार्ड त्वरित न मिळाल्याने त्यांनी गैरसमजुतीतून नव्याने ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणीचा फॉर्म क्रमांक ६ एकूण सहा वेळा भरला. ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांची वरील सहापैकी एक नोंद कायम ठेवून इतर पाच नावाच्या नोंदी वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक-७ भरून घेण्यात आल्याचे म्हटले आहे.
तसेच हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील दुबार मतदार शोधण्याचे काम हाती घेण्यात आले असून दुबार नाव असणाऱ्या मतदारांनी नमुना अर्ज ७ भरून आपले मतदार यादीत नाव एकाच ठिकाणी ठेवण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच, सर्वच बीएलओ यांना त्यांच्या मतदार यादी भागाची काटेकोर पडताळणी करून आवश्यकते नुसार दुबार मतदारांचे फॉर्म क्रमांक-७ भरून घेण्याच्या व त्यावर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही या खुलाशात म्हटले आहे . याचबरोबरीने, मतदार यादीच्या आगामी पुनरिक्षण कार्यक्रमात देखील अशाच पद्धतीने दुबार दावे वगळण्यासाठी काटेकोर तपासणी व कार्यवाही करण्याच्या सूचना देखील जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सर्व यंत्रणेला दिल्याचे खुलाशात शेवटी म्हटले आहे.
दरम्यान सुषमा गुप्ता यांची नोंदविली गेलेली सर्व सहा नावे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या एकाच यादीत,एकाच भाग क्रमांकात, मतदार यादीतील एकाच पानावर आढळून आली. साहजिकच बीएलओच्या नजरेतून हा प्रकार सुटला कसा, त्याचबरोबरीने मतदानाच्या दिवशी तरी हा प्रकार बीएलओसह मतदान केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षाचे मतदान प्रतिनिधी यांच्या निदर्शनास आला होता का हा प्रश्न उपस्थित होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही निवडणुकीनंतर अलीकडे प्रसिद्ध मतदार यादीतही ही सर्व नावे आढळून आली आहेत, साहजिकच यावेळीही हा प्रकार सर्वांच्या नजरेतून सुटला कसा हाही प्रश्न उपस्थित होत आहे...