Navyug Palghar Weekly नवयुग पालघर
“संकटाच्या काळात हा विमा पॅकेज कुटुंबाचा मजबूत आधार” — मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे
पालघर जिल्हा परिषद-युनियन बँक सामंजस्य कराराचा लाभ — शिक्षकाच्या पत्नीला १ कोटी १५ लाखांचा विमा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते सुपूर्द
पालघर, १५ ऑगस्ट :
“जिल्हा परिषदेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने युनियन बँक ऑफ इंडियासोबत झालेल्या सामंजस्य करारांतर्गत उपलब्ध जीवन, अपघाती आणि आरोग्य विमा पॅकेजचा लाभ घ्यावा. ही सुविधा केवळ आर्थिक संरक्षण नाही, तर संकटाच्या काळात कुटुंबासाठी एक मजबूत आधार ठरते,” असे आवाहन आज मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद–युनियन बँक सामंजस्य कराराचा एक प्रत्यक्ष आणि हृदयस्पर्शी लाभ दिसून आला. अपघाती मृत्यू झालेल्या स्वर्गीय शिक्षक विलास दत्तू मढवी यांच्या पत्नी रंजना विलास मढवी यांना रु. १ कोटी १५ लाखांचा अपघाती विमा दाव्याचा धनादेश रानडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी रानडे यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून सांगितले की, हा करार केवळ बँकिंग आणि खात्यापुरता मर्यादित नसून, तो जीवनातील अनिश्चित प्रसंगात आर्थिक सुरक्षेचे भक्कम कवच ठरतो.
कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, अतुल पारसकर, आर.एच. पाटील, माजी अधिकारी धनराज पांडे, तसेच युनियन बँकेचे उपक्षेत्र प्रमुख सावन शिव (मुंबई-बोरीवली) आणि बँकेचे रवि रंजन उपस्थित होते.
युनियन बँकेचे सावन शिव यांनी सांगितले की, “अपघाती व मृत्यू दावे त्वरित, पारदर्शक व संवेदनशीलतेने निपटवणे ही युनियन बँकेची प्रामाणिक वचनबद्धता आहे. ग्राहकांचे आर्थिक स्थैर्य आणि त्यांच्या कुटुंबाचा आत्मविश्वास वाढवणे हे केवळ सेवा नव्हे, तर आमचे कर्तव्य आहे.”
ऑक्टोबर २०२३ च्या सामंजस्य करारानंतर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यासोबत जीवन विमा, अपघाती विमा आणि आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजचा कार्यक्रम या योजनेच्या परिणामकारकतेचे आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.