२६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री विजय नगर, विरार (पू.) येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळून. ६ महिला, ८ पुरुष व ३ बालकांसह 1७ जणांचा मृत्यू , ९ जण जखमी .

Date: 2025-08-29
news-banner

   नवयुग पालघर Navyug Palghar Weekly 

August 24,2025      

दुर्घटनाविवरण

              २६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री विजय नगर, विरार (पू.) येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळला. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला, ज्यात ६ महिला, ८ पुरुष व ३ बालकांचा समावेश आहे. तसेच ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

            विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बचाव व पुनर्वसन कार्य वेगाने राबवण्यात आले आहे. राज्य प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिका प्रशासनाकडून केला जातो, अशी माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बचाव कार्य

           दुर्घटनेची माहिती मिळताच, महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल, NDRF, महसूल आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त इमारत (G+4) आणि जवळच्या चाळींमध्ये जवळपास ५० सदनिका होत्या; त्यापैकी मागील भागातील अंदाजे १२ सदनिका कोसळल्या.
शेजारील घरे आणि इतर धोकादायक इमारतीतील लोकांचे तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले.
महानगरपालिकेने रहिवाशांच्या मौल्यवान वस्तू त्यांना परत देण्याची सोय केली आणि तत्काल समाज मंदिर, विरार पूर्व येथे राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांनी घटनास्थळी भेट देऊन, परिस्थितीचा आढावा घेत, संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

         दरम्यान राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट दिली व शासनाच्या वतीने कुटुंबियांना मदत घोषित केली आहे,

प्रशासकीय कारवाई

            दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बांधकामास जबाबदार असणाऱ्या जमीन मालक व विकासकाविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे.
            मृत व्यक्तींच्या शवविच्छेदनानंतर त्यांच्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. काही मृतांची शव त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
          जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महानगरपालिका प्रशासन उचलणार असून, राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदतीची हमी देण्यात आली आहे.

प्रशासनाची उपाययोजना

          खासदार हेमंत सवरा, आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे-,पंडित आदींसह स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आदींनी घटनास्थळी भेटी दिल्या.

स्थानिक  प्रशासन, मनपा आयुक्त, जिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, NDRF कर्मचारी, अग्निशमन दल व पोलिस यंत्रणा घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्य, पुनर्वसन आणि मदतीचे नियोजन करत आहेत...


Leave Your Comments