हे दृश्य आहे, नवली रेल्वे फाटक बंद केल्यानंतर नवली व परिसरातील हजारो ग्रामस्थांना रेल्वेच्या छोट्या पुलाखालून दिलेल्या पर्यायी रस्त्याचे.. हा मार्ग ०४ सप्टेंबर रोजीच्या पावसामुळे पुन्हा पाण्याखाली आला. याच पाण्यातून वाट काढत असताना, एक तरुण स्कुटरसह अडकून

Date: 2025-09-05
news-banner
https://youtu.be/ooXs0znsyCk?si=EhbU9tk1OErZCSrf
Navyug Palghar Weekly नवयुग पालघर ....

         हे दृश्य आहे, नवली रेल्वे फाटक बंद केल्यानंतर नवली व परिसरातील हजारो ग्रामस्थांना रेल्वेच्या छोट्या पुलाखालून दिलेल्या पर्यायी रस्त्याचे.. हा मार्ग ०४ सप्टेंबर रोजीच्या पावसामुळे पुन्हा पाण्याखाली आला. याच पाण्यातून वाट काढत असताना, एक तरुण स्कुटरसह अडकून पडला. त्यातून तो कसाबसा बाहेर पडला पण त्याची स्कुटर वाहून गेली. वीरेंद्र पाटील सह तिथले काही ग्रामस्थ मदतीला धावून आले आणि क्रेनच्या साहाय्याने दुचाकी बाहेर काढण्यात यश मिळाले.
            पालकमंत्री गणेश नाईक याच दिवशी दुपारपर्यंत पालघरला होते. त्यांच्या उपस्थितीत ४ सप्टेंबर रोजी नवली व परिसरातील गाव पाड्यातील ग्रामस्थांना होणारा त्रास वीरेंद्र पाटील यांनी निदर्शनास आणून दिला. मात्र याचे गांभीर्य ना जिल्हा प्रशासनाला, ना समर्पित रेल्वे मालवाहतूक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना. 
              पुन्हा हा केवळ नवलीचा प्रश्न नाही. तर सफाळे येथील रेल्वे फाटक देखील कोणताही योग्य पर्याय न देता, बंद करण्यात आल्याने परिसरातील २५ हजारहून अधिक ग्रामस्थाची गेले कित्येक महिने प्रचंड गैरसोय होत आहे. केळवे रोड येथील परिस्थिती देखील अशीच आहे. त्यातच पश्चिम रेल्वेच्या ह्या मार्गावरील बोईसर वंजारवाडा येथील रेल्वे फाटक आजही सुरू आहे. तर मग इतरत्र रेल्वे फाटक बंद करण्याची घाई का केली ?
          रेल्वेला ( समर्पित रेल्वे मालवाहतूक मार्ग ) आपली मालवाहतूक सुरू करायची असेल तर ,  आवश्यक सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. यासाठी ग्रामस्थांना वेठीला का धरावे हा, प्रश्न आहे. मात्र रेल्वेची जबाबदारी स्वतःवर घेऊन, जिल्हा प्रशासन हजारो ग्रामस्थांचे हाल करत आहे, असेच म्हणावं लागेल. 
आश्चर्य म्हणजे पुलाखालून पाणी वाहत असताना, ग्रामस्थांना आवश्यक सूचना देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. एरवी रात्रीही याच मार्गाचा वापर होत असताना, तिथे विद्युत दिव्यांची देखील कोणतीही सोय नाही.
            ०४ सप्टेंबर रोजीचा प्रसंग याचे गांभीर्य अधोरेखित करते.

Leave Your Comments